October 27, 2025

भुजबळांकडून अजित पवारांवर टीका, पण पवारांनी थेट भाष्य टाळले

पुणे, २३ डिसेंबर २०२४ ः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांचा थयथयाट चालू आहे. अजित पवार यांनी माझे खच्चीकरण केले अशी टीका ते जाहीर बैठका, पत्रकार परिषदांमधून करत आहेत. पण या संदर्भात अजित पवार मात्र बोलण्यास तयार नाहीत. त्यांनी आज पुण्यामध्ये छगन भुजबळांचा प्रश्न हा आमचा अंतर्गत आहे, तो आम्ही सोडवू असे उत्तर देत त्यावर अधिक भाषा टाळले आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी मंगळवारी शहर व जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत प्रश्‍न विचारल्यानंतर, थोडक्‍यात उत्तर देत त्याविषयी बोलण्याचे टाळले.

प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत १५
दिवसांनी

पवार यांनी शहर व जिल्ह्यातील प्रश्‍नासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीस महापालिका, पोलिस, विभागीय कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. याविषयी पवार म्हणाले, “”शहरातील वाहतुक कोंडी, रिंगरोड, यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये प्रलंबित प्रश्‍नासंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी १५ दिवसांनी एक बैठक होणार आहे. या बैठकीस पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त या सर्वांना बोलावले जाणार आहे. या बैठकीतुन प्रलंबित प्रश्‍नांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न असेल. या बैठकीच्यावेळी लोकप्रतिनीधी देखील भेटण्यासाठी आले होते, त्यांचे पीएमआरडीए, दोन्ही महापालिका, विभागीय आयुक्त कार्यालयाशी संबंधित प्रश्‍न होते. सारथीबाबतही काही प्रश्‍न आहेत, नियोजन समितीअंतर्गत सारथी येते, त्यामुळे त्यांचेही प्रश्‍न आम्ही समजुन घेणार आहोत. वढु तुळापुर येथे संभाजी महाराज यांच्या स्मारकाची पाहणी केली जाणार आहे, कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला भेट देण्यासाठी 1 जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याचीही पाहणी करणार आहोत.”

पवार म्हणाले, “केईएम रुग्णालयाच्या जागेचा प्रश्‍न आहे, विभागीय आयुक्तांनी त्यासंदर्भात माहिती दिली आहे. पर्यायी जागा दिल्यास ते तिकडे स्थलांतरीत होण्याची शक्‍यता आहे, त्यावरही काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करु. बारामतीमध्ये १०० खाटांचे रुग्णालयात उभारले जाणार आहे. संबंधित रुग्णालयाला कोणत्या प्रकारच्या फरशा बसवाव्यात, यासंदर्भातील पाहणी केली. पुण्यात पाहण्यासाठीचे पर्पाय आहेत. त्यादृष्टीने पाहणी केली. आवश्‍यक साधनसामुग्रीबाबत चर्चा झाली.’