December 2, 2025

बलात्काराच्या घटनेनंतर महापालिकेला आली जाग; हातगाड्यांवर केली कारवाई

पुणे, २७ फेब्रुवारी २०२५: स्वारगेट येथील जेधे चौक व बस स्थानकातील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आलेला असताना या परिसरातील हातगाड्यांवर, खाद्यपदार्थांचे स्टॉल नियमांचे उल्लंघन केले जात आहे. तेथे अनेकजण तेथेच मद्यपान करतात तरीही महापालिकेकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र बस स्थानकात घडलेल्या पार्श्‍वभूमीवर आज महापालिकेने कारवाई केली. त्यात सिलेंडर व अन्य साहित्य जप्त केले आहे.

‘‘महापालिकेनेकडून यापूर्वी तेथे दंडात्मक कारवाई केली. आज केलेल्या कारवाईत प्रचंड अस्वच्छता आढळून आलेली आहे. जास्त जागा व्यापल्याने काऊंटर, खुर्च्या जप्त केल्या आहेत. काही सिलेंडरही जप्त केले आहेत.’’ – प्रदीप आव्हाड, सहाय्यक आयुक्त

स्वारगेट बस स्थानकातील घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळलेली आहे. या घटनेमुळे स्वारगेट बस स्थानकातील असुविधा, पोलिस, राज्य परिवहन महामंडळाच्या कामातील त्रुटी चव्हाट्यावर आल्या आहेत. जेधे चौकात महापालिकेतर्फे खाद्य पदार्थ्यांच्या गाड्यांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. या गाड्या कायम स्वरुपी पादचारी मार्गावर लावण्यात आलेल्या असतात. त्यामुळे या वर्दळीच्या चौकात पादचाऱ्यांना पादचारी मार्गाचा वापर करता येत नाही. त्यामुळे त्यांना रस्त्यावरून चालावे लागते. सोलापूर रस्त्यावरून कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. या चौकातील वळणावर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच पादचारीही लवकर दिसत नसल्याने वाहनचालकांची विशेषतः पीएमपी व एसटी बस चालकांची तारांबळ उडते. या भागातील अतिक्रमण हे वाहनचालक आणि पादचारी या दोघांसाठीही धोकादायक झालेले आहे.

या चौकाच्या परिसरात वाहनांमध्ये, उड्डाणपुलाच्या खाली, रस्त्याच्या कडेला बसून दारू पिणाऱ्यांचे, गांजा ओढणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. व्यसन केल्यानंतर हे तळीराम या चौकातील गाड्यांवर अंडाभुर्जी, पावभाजी, पुलाव, भजी खाण्यासाठी जातात. दारू पिऊन या ठिकाणी याठिकाणी गोंधळ घालतात. अशीच स्थिती बस स्थानकातही दिसून येते. आज बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातर्फे तेथे कारवाई करण्यात आली. अधिकृत जागेपेक्षा जास्‍त जागा व्यापणे, शेड टाकणे, काऊंटर, टेबल खुर्च्या टाकल्याने व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. तसेच रस्त्यावर अन्न शिजविण्याची परवानगी नसल्याने काही सिलेंडर जप्त केले आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त प्रदीप आव्हाड यांनी दिली.

स्थानकाच्या ऐन दारात व्यवसाय
बस स्थानकाच्या ऐन दारामध्ये हातगाड्या, स्टॉल लावून व्यवसाय केला जात आहे, त्याच ठिकाणी ॲटोरिक्षा थांबलेल्या असतात. त्यामुळे बस चालकांना बस स्थानकातून आत आणि बाहेर पडताना पुरेशी जागा मिळत नाही. अनेक बस रस्त्यावर रांगेत थांबल्याने वाहतूक कोंडी होते.