पुणे, दि. ३ मार्च, २०२५ : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डिझायनर्स, डिझाईन व्यावसायिक, या क्षेत्रातील तज्ज्ञ व गीतकार यांची उत्कृष्ट व्याख्याने आणि डिझाईन क्षेत्रातील आयामांवर, भविष्यातील संधींबद्दल अनेकविध कार्यशाळांच्या माध्यमातून झालेली चर्चा यांद्वारे नुकताच संपन्न झालेला १९ वा पुणे डिझाईन फेस्टिव्हल विशेष ठरला. असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय) पुणे विभागाच्या वतीने नगर रस्त्यावरील हयात रिजन्सी या ठिकाणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतातील डिझाईन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण व अग्रणी महोत्सव अशी ओळख असलेल्या या महोत्सवासाठी यावर्षी अभिकल्पनेतील शाश्वततेच्या पार्श्वभूमीवर ‘माइंड द वर्ल्ड’ ही मध्यवर्ती संकल्पना ठेवण्यात आली होती. प्रोडक्ट डिझाईन, युएक्स डिझाईन, फिल्म अँड अॅनिमेशन, स्पेस डिझाईन, आर्किटेक्चर आणि ग्राफिक डिझाईन यांसारख्या क्षेत्रातील ३० हून अधिक नामवंत वक्ते, उद्योजक आणि जागतिक पातळीवरील प्रतिनिधी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी जागतिक स्तरावरील अग्रणी स्ट्रॅटेजिक डिझाईन एजन्सीचे सह-संस्थापक असलेल्या डिक पॉवेल यांचे बीजभाषण झाले. पॉवेल यांनी यावेळी डिझाईन क्षेत्रातील आशावादी भविष्य या विषयावर आपले विचार मांडले. यानंतर संपन्न झालेल्या विविध सत्रांमध्ये आयआयटी इंदौरचे प्राध्यापक कीर्ती त्रिवेदी, युजर कनेक्ट कन्सल्टन्सी (युसीसी)च्या संस्थापिका व संचालिका असलेल्या शिप्रा भुतडा, आयआयटी बॉम्बेच्या आयडीसी स्कूल ऑफ डिझाईनचे प्रमुख अनिरुद्ध जोशी, महिंद्रा अँड महिंद्राच्या डिझाईन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष असलेले अजय सरन शर्मा, मुंबई मधील वैभव स्टुडीओचे कलात्मक संचालक आणि संस्थापक असलेले वैभव कुमरेश, फिल्ममेकर, अॅनिमेटर आणि इलिस्ट्रेटर असलेल्या नीना सबनानी यांसारख्या वक्त्यांनी सहभाग घेतला.
संपूर्ण महोत्सवात वर्ल्ड डिझाईन प्रोटोपॉलिस म्हणून निवड झालेल्या बंगळूरु शहरातील नियोजित विविध प्रकल्पांचे सादरीकरण हे महत्त्वाचे आकर्षण ठरले. याबरोबरच पुणे शहरातील शिवाजीनगर मतदार संघातील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. या दोघांनीही पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमधील विविध प्रकल्पांचा दर्जा उंचावण्यासाठी व प्रकल्प अधिकाधिक लोकाभिमुख करण्याकरता डिझायनर्सना प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणे गरजेचे असल्याचा मुद्दा अधोरेखित केला.
डिझायनर्सचा वैज्ञानिक व कलात्मक दृष्टीकोन शहरांतील प्रकल्पांचा दर्जा उंचावण्यासाठी मौल्यवान योगदान देऊ शकतो असे मत सिद्धार्थ शिरोळे यांनी मांडले. दळणवळणाच्या सुविधा, कला व संस्कृतीचे प्रसारण व हरित सेतू प्रकल्पाचा प्रभाव वाढवणे या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये डिझायनर्सचा प्राधान्याने अंतर्भाव करण्यात यावा, असे शेखर सिंह म्हणाले.
या दोन दिवसीय महोत्सवात ‘डिझाईन रिसर्च फ्रॉम इनसाईट्स टू इम्पॅक्ट’, ‘शेपिंग अ वर्ल्ड विथ पर्पज अँड इम्पॅक्ट’, ‘डिझाईन ट्रिब्युट – आरके अॅज् आय न्यू हिम’, ‘सस्टेनेबल फ्युचर्स – दी पॉवर ऑफ माइंडफुल इम्पॅक्ट’ या विषयांवर चर्चासत्रे देखील संपन्न झाली शिवाय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महोत्सवादरम्यान डिझाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रोजेक्ट्सची स्पर्धा असलेल्या ‘बॅटल ऑफ प्रोजेक्ट्स २०२५’ चा पुरस्कार समारंभ पार पडला.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर