October 26, 2025

अग्निशमन दलाच्या जवानाची तत्परता; ड्युटीवरून घरी जाताना बसला लागलेल्या आगीवर वेळेत मिळवले नियंत्रण

पुणे, ३ मार्च २०२५: आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एरंडवणा अग्निशमन केंद्र येथे ड्युटीस असणारे फायरमन राहुल वाघमोडे हे आपली सकाळची शिफ्ट संपवून मोशी येथे आपल्या दुचाकीवर घरी जात होते. तेव्हा बाजीराव रस्ता येथील हिराबाग चौक येथे त्यांनी एका सीएनजी असणाऱ्या पीएमपीएमएल बसमधून (हडपसर – भेकराईनगर) पाठीमागील बाजूस काही प्रमाणात आग लागली असल्याचे व धुर ही येत असल्याचे पाहताच त्यांनी लगेचच ही घटना त्वरीत अग्निशमन दल नियंत्रण कक्षास कळवली.

त्याचवेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने प्रथमत: बसमधील प्रवाशांना वाहनचालक तसेच वाहक यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर घेण्यात आले. त्यानंतर अग्निरोधक उपकरण (फायर एक्स्टिंग्युशर) बसमधून घेऊन त्याचा वापर करीत पाचच मिनिटात आग पुर्ण विझवून पुढील अनर्थ टाळला. बस व प्रवासी यांचे आगीमध्ये होणारे मोठे नुकसान ही टाळत आपले कर्तव्य चोख बजावले.

अग्निशमन दलाचे जवान राहुल वाघमोडे यांनी तत्परतेने केलेल्या कार्यवाहीचे तेथे असलेले बसमधील प्रवासी, नागरिक व पीएमपीएमएलचे कर्मचारी यांनी फायरमन वाघमोडे यांच्या उत्तम कामगिरीचे कौतुक करीत अग्निशमन दलाचे ही आभार मानले.