सातारा, २५/०३/२०२५: मुकुल माधव फाउंडेशन, पुणे व मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी व सातारा जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील पुरुष बंदयांसाठी फास्टफूड प्रशिक्षण कोर्सची सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्र कारागृह पोलीस विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, डॉ.सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनानुसार कारागृह विभागाच्या “सुधारणा पुनर्वसन” या ब्रीदवाक्यानुसार कारागृहातील बंदयांसाठी विविध उपक्रम राबवण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. त्यानुसार सातारा जिल्हा कारागृहात विविध प्रशिक्षणाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत.
मुकुल माधव फाउंडेशनचे सदस्य संतोष शेलार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कारागृहातील बंदयांसाठी त्यांची संस्था अनेक प्रशिक्षणाचे उपक्रम राबवित आहेत. या कारागृहात देखील फास्ट फूड कोर्स सारखे अजूनही अनेक उपक्रम राबवून बंदयांसाठी विविध वैद्यकीय आरोग्य शिबिर देखील राबविण्यात येणार आहेत.
मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सातारा यांचे प्रतिनिधी श्री विनोद जाधव यांनी सांगितले की कारागृहातील बंदयांसाठी अशा प्रकारचा उपक्रम हा त्यांच्या कॉलेज साठी प्रथमच व नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. कारागृह प्रशासनाने सांगितल्यास आमच्या कॉलेजच्या माध्यमातून अजून देखील विविध उपक्रम बंदयांसाठी आम्ही करण्यास उत्सुक आहोत.
कारागृहाचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे म्हणाले की कारागृहातील बंदयांसाठी आमचे प्रशासन नेहमीच वेगवेगळे उपक्रम आरोग्य शिबिरे असे कार्यक्रम घेत असते बंदयांनी देखील सदर उपक्रमांचा पुरेपूर फायदा घेऊन कारागृहातून प्रशिक्षित होऊन बाहेर पडावे हा आमचा प्रयत्न असतो.
कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी कार्यक्रमाचा समारोप करताना सांगितले की, कारागृह विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार व कारागृह विभागाच्या ब्रीदवाक्य “सुधारणा पुनर्वसन” यानुसार कारागृहात दाखल होणारा प्रत्येक बंदी हा प्रथमतः माणूस आहे आणि माणसाला सुधारण्याची संधी मिळावी यासाठी कारागृह प्रशासन नेहमीच अविरत कार्य करत असते. याचाच एक भाग म्हणून कारागृहात सद्यस्थितीत असलेला बहुतांश युवक व तरुण वर्ग यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी मुकुल माधव फाउंडेशन, पुणे व मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सातारा यांच्या माध्यमातून “फास्ट फूडचा” कोर्स सुरू करण्यात आला आहे. सदर कोर्समधून बंदयांना पाणीपुरी, रगडापुरी, कचोरी, वडापाव, मिसळपाव, समोसा, उपवासाचे पॅटीस, कांदा भजी, बटाटा भजी, गोबी मंचुरियन, व्हेज मंचुरियन, हक्का नूडल्स, फ्राईड राईस, व्हेज मोमोज, बर्गर, पास्ता, पिझ्झा असे विविध पदार्थ शिकवण्यात येणार आहेत. समाजात असताना गुन्हे करून कारागृहात आलेल्या तरुण व युवकांना पुन्हा त्यांच्यात सुधारणा करून समाजात मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा नेहमीच मानस असतो.
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुकुल माधव फाउंडेशनचे प्रतिनिधी संतोष शेलार, कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्रतिनिधी विनोद जाधव, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, सुभेदार मानसिंग बागल, हवालदार दारकू पारधी, शिपाई राकेश पवार, बालाजी मुंडे, रविराज शेळके व इतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
महादेवी : राजू शेट्टी यांनी अनंत अंबानी आणि अंबानी परिवार यांचे मानले आभार