October 25, 2025

बनेश्वर फाटा ते वनविभाग गेट रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांचे उपोषण; प्रशासनाकडून लिखित आश्वासनानंतर उपोषण मागे

पुणे, ९ एप्रिल २०२५: भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग गेट या रस्त्याची दयनीय अवस्था लक्षात घेता खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी १० वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता, मात्र शासन आणि प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.

सायंकाळी ५ वाजता प्रशासनाकडून सुळे यांची भेट घेण्यात आली. यावेळी प्रशासनाने २ मे २०२५ पासून काम सुरू करण्याचे लिखित स्वरूपात आश्वासन दिले. या आश्वासनानंतर सुळे यांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, काम ठरलेल्या वेळेत पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

“जनतेने विश्वासाने निवडून दिले असून, त्यांच्या हिताच्या कामांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. आम्ही नेहमीच पाठपुरावा करत आलो आहोत, पण अडवणूक झाली तर संघर्षाचा मार्ग स्वीकारावा लागतो,” असे सुळे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले आणि शासन-प्रशासनाने यापुढे जनहिताच्या कामांबाबत अडथळे आणू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.