October 25, 2025

एआयचा वापर करताना स्वतःच्या बुद्धीचे संस्करण करा: डॉ. भूषण केळकर

पुणे, दि. १० एप्रिल, २०२५ : आर्टिफिशीयल इंटेलिजन्स अर्थात एआयचा वापर करण्याबाबत आपण गाफील राहून चालणार नाही. त्याचा वापर करताना त्याची कॉपी करण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीचे संस्करण करण्याचा सल्ला आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. भूषण केळकर यांनी तरुणांना दिला.

पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय (सीएसीपीई) आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्यातर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘बीसी टू एडी’ अर्थात बिफोर चॅटजीपीटी टू एआय डिसरप्शन’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी ‘एआय प्ले अलॉन्ग’ या विषयावर डॉ. भूषण केळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेचे वाढते प्रमाण, त्याद्वारे होत असलेले मूलभूत बदल व नजीकच्या भविष्यातील संभाव्य धोके या पार्श्वभूमीवर नवीन तंत्रज्ञान, नवकल्पना यामध्ये एआय कसे प्रभावीपणे काम करू शकते, हे समजून घेण्याच्या उद्देशाने कोथरूड, मयूर कॉलनी येथील एमईएस संस्थेच्या सभागृहात या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रीय मंडळ व एमईएसचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, महाराष्ट्रीय मंडळाचे सचिव रोहन दामले, शिक्षण संचालक नेहा दामले, सीएसीपीईचे प्राचार्य डॉ. सोपान कांगणे, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर देसरडा, परिषदेच्या समन्वयिका डॉ. श्रद्धा नाईक, एमईएसचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, एमईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, एमईएसच्या नियामक मंडळाचे सदस्य राहुल मिरासदार आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे क्रीडा संचालक डॉ. उमेश बिबवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा वापर करण्याचे प्रमाण हे दिवसागणिक वाढत जाणार आहे, त्यामुळे सध्या आपण एआयशी स्पर्धा नाही करत आहोत असे सांगत डॉ. केळकर म्हणाले “भविष्यात आम्हाला एआय जाणणाऱ्या लोकांशी स्पर्धा करावी लागणार आहे. त्यामुळे या क्षेत्राबाबत आपण गाफील राहून चालणार नाही. सध्या होत असणाऱ्या बदलानुसार आपल्याला स्वतःमध्ये देखील बदल करावे लागणार आहेत. आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा वापर करताना दहा टक्के त्याला प्रश्न विचारणे आणि दहा टक्के भाग हा त्याने दिलेल्या उत्तराचे आपल्या डोक्याचा वापर करून निवड करणे आवश्यक राहणार आहे. हे करताना आपल्याला बुद्धीचा योग्य प्रकारे वापर करण्याखेरीज पर्याय नाही.”

सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये इंडस्ट्री ४.० याचे शिक्षण दिले जात नाही, याची खंत वाटत असल्याचे सांगताना डॉ. केळकर म्हणाले “भारतामध्ये इंडस्ट्री ५.० या औद्योगिक क्रांतीला सुरवात झाली आहे. माहिती-तंत्रज्ञानात होत असणारे बदल हा त्याचाच भाग आहे. देशातील मुले, शिक्षक हे इंडस्ट्री ४.० या औद्योगिक क्रांतीच्या बद्दल अनभिज्ञ आहेत. चीनमध्ये एआय हा विषय मुलांना सक्तीचा असून त्यांच्या अभ्यासक्रमात त्यावर आधारित १६ पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे.”

क्रीडा क्षेत्रात एआयचा वापर करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. खेळाडूंची गुणवत्ता सुधारणे, खेळात वापरण्यात येणारी व्युहरचना, खेळाचे व्यवस्थापन, खेळाच्या चाहत्यांचे व्यवस्थापन करणे, खेळाच्या नियमांची अंमलबजावणी करणे अशा अनेक ठिकाणी त्याचा अत्यंत प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. त्यामुळे एआयचे प्रस्थ ज्या प्रकारे वाढत आहे. त्याला दोष देण्यापॆक्षा आपण त्याचा स्वीकार करून, त्याचे शिक्षण घेऊन पुढे प्रगती करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. केळकर यांनी नमूद केले.