October 24, 2025

सेन्सॉरशिप संदर्भात मी कलात्मक मूल्यांचा विचार प्राधान्याने करतो – ब्रूस गथ्री

पुणे, दि. ११ एप्रिल, २०२५ : “संस्थात्मक पातळीवर काम करताना घोषित आणि स्वयंघोषित, अशा दोन्ही सेन्सॉरशिपचा सामना करावा लागतो. मात्र, दोन्हीच्या संदर्भात मी आधी कलात्मक मूल्यांचा विचार प्राधान्याने करतो. स्वयंघोषित सेन्सॉरशिपवाल्यांना कसे हाताळायचे, याचा विचार आणि कृती, त्या त्या कलाकृतीच्या संदर्भात ठरवली जाते”, असे प्रतिपादन नॅशनल सेंटर फॉर परफाॅर्मिंग आर्ट्स (एनसीपीए)च्या नाट्य व चित्रपट विभागाचे प्रमुख ब्रूस गथ्री यांनी केले. ‘कोणत्याही कलाकृतीच्या संदर्भातील कुठल्याही आक्षेपाविषयी संबंधित सर्व घटकांशी समोरासमोर संवाद साधून, योग्य ते बदल स्वीकारले जातात’, असेही ते म्हणाले.

नाट्य निर्मिती क्षेत्रातील नवकल्पनांसोबतच स्वतंत्र नाट्य निर्मात्यांना आपल्या समर्पित प्रयत्नांद्वारे सक्षम बनविणारी नाट्य संस्था म्हणून ओळख असणाऱ्या भाषा सेंटरच्या वतीने पुण्यात पहिल्यांदाच मंच नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येत्या रविवार १३ एप्रिल दरम्यान हा नाट्य महोत्सव टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या श्रीराम लागू रंग अवकाश येथे संपन्न होणार आहे. डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो यांचे विशेष सहकार्य या महोत्सवाला मिळाले आहे.

‘लुकिंग बियाँड परफॉर्मन्स’ या विषयावर बोलताना ब्रूस यांनी एनसीपीएच्या सर्व वार्षिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, पाश्चात्त्य संगीत, लोककला, रंगभूमी, चित्रपट, समूहकला, एकपात्री अशा सर्व कलाप्रकारांना सामावून घेणारे शेकडो उपक्रम एनसीपीए सादर करते. सोबतच अनेक विषयांवरील व्याख्याने, सप्रयोग सादरीकरणे, संकल्पनात्मक कार्यक्रम, कार्यशाळा यांची रेलचेल वर्षभर असते, असे ते म्हणाले.

सुप्रसिद्ध नाटककार इरावती कर्णिक यांनी ब्रूस गथ्री यांच्याशी संवाद साधला. तेव्हा शासनाचे अधिकृत सेन्सॉर मंडळ, त्यांनी घेतलेले आक्षेप आणि स्वयंघोषित सेन्सॉरशिप लादणारे काही घटक, यांच्याविषयी ब्रूस यांनी भाष्य केले. ते पुढे म्हणाले, “शासकीय सेन्सॉर मंडळाने काही आक्षेप घेतले किंवा बदल सुचवले, तर संस्था म्हणून आम्ही आधी लेखक, दिग्दर्शक, कलाकारांशी, तसेच संस्थेच्या संबंधित सर्व पदाधिकार्यांशी सविस्तर चर्चा करतो. मात्र, कलात्मक दृष्टी कायम प्राधान्यक्रमावर असते. कलाकृतीच्या कलात्मकतेला हानी पोचणार नसेल, तर सुचवलेले बदल आम्ही करतो. मात्र, शासकीय प्रमाणपत्र मिळूनही काही समाजघटक दबाव, राजकीय पाठिंबा, आर्थिक मुजोरी आणि झुंडशाही यांच्या बळावर काही अनुचित कृती करू पाहात असेल किंवा तशी धमकी वगैरे देत असेल, तर संस्था म्हणून सर्वांत आधी पोलिसांकडे जाणे, संरक्षण मागणे या गोष्टी केल्या जातात. कारण यामध्ये धोका स्वीकारणे असते. दबाव, धमकी, धाक दाखवणे, हिंसाचार करणे, नासधूस करणे, संस्थेच्या जागेवर अतिक्रमण करणे, दंगे करणे अशा गोष्टी काळजीपूर्वक हाताळाव्या लागतात कारण त्या गुंतागुंतीच्या असतात.”

अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, प्रायोजकत्व आदी मुद्यांवरही ब्रूस यांनी यावेळी विवेचन केले. ‘युवा कलाकारांमध्ये कलाविषयक जबाबदारीचे भान जागवणे आणि योग्य तिथे त्यांचे कौतुक करणे, यातूनच रंगभूमीला नवे व ताजे कलाकार मिळतील’, असे सांगून ते म्हणाले, “निर्मितीसाठी सर्जनशील सहकार्य मिळवणे महत्त्वाचे असते. विभिन्न अभिरुचींचे रसिक मिळवणे, त्यांच्यासमोर दर्जेदार कलाकृती सादर करण्यासाठी निर्मितीचे सहकार्य करणारे हात मिळवणे, हे जबाबदारीचे काम असते. चुका करत, त्या सुधारतच हे शिकता येते. अर्थात त्यामागे तुमची वैयक्तिक ओढ, निष्ठा, कलेविषयीचे प्रेम, अभ्यास समोरच्या व्यक्तीला जाणवावे लागतात. कलाकाराला मोकळेपणाने त्याला हवे ते मांडता येण्यासाठी अवकाश देणे, हे संस्था म्हणून आपले पहिले काम आहे, असे मी मानतो.”

युवा कलाकारांना मी एकच सांगू इच्छितो, त्यांनी कमी बोलले पाहिजे आणि जास्त ऐकले व वाचले पाहिजे. वैयक्तिक आवड आणि रसिकांच्या अपेक्षा, यामध्ये सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न कलाकाराने केला पाहिजे. नव्या काळातील उपलब्ध सर्व माध्यमे, व्यासपीठे कलाकारांनी सकारात्मक पद्धतीने अवश्य वापरावीत, कारण त्या सर्व व्यासपीठांना स्वतःचा प्रेक्षक आहे. त्या प्रेक्षकापर्यंत पोचणे कलाकाराला आवश्यक आहे, असेही ब्रूस म्हणाले.

रंगभूमीवरील सादरीकरणाला संस्थेतील समृद्ध ग्रंथालय, संदर्भ, दृकश्राव्य खजिना, छायाचित्रे, अनुभवी कलाकार यांचे सहकार्य असावे लागते. याबाबतीत एनसीपीए समृद्ध आहे. त्यामुळे निर्मिती, सादरीकरण आणि त्यातून शिकण्याची प्रक्रिया हा एक समृद्ध करणारा अनुभव असतो. दर्जेदार आशय, कलात्मक सादरीकरण यांना निर्मितीच्या संतुलनाची गरज असते. कला ही अमूल्यही असते आणि मौल्यवानही असते’, असे ते म्हणाले. गार्गी दातार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. भाषा सेंटरचे विवेक मदन यांनी नाट्यमहोत्सवाची माहिती दिली.