October 24, 2025

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदार संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर

पुणे, १७ एप्रिल २०२५: पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत घराणे म्हणून थोपटे घराण्याकडे पाहिले जाते. अनंतराव थोपटे यांच्यानंतर संग्राम थोटपे यांचे नाव घेतले जाते. गेले अनेक वर्ष थोपटे घराण्याने भोल वेल्हा, मुळशी भागात सत्ता गाजवली आहे. पण आता विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांचा पराभव झाल्याने काँग्रेसला झटका बसला. त्यानंतर आता हे थोपटे भाजपच्या वाटेवर आहेत. यासंदर्भात त्यांनी आज प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती.

काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. पुणे जिल्ह्यातील भोर-मुळशी वेल्हा हा मतदारसंघ काँग्रेसचा गड राहिलेला आहे. हा मतदारसंघ गेल्या ४० वर्षांपासून थोपटे कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे. कुठल्याही मतदार संघात काही होईल मात्र या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार जिंकणार, असा विश्वास काँग्रेस पक्षश्रेष्ठींना होता. मात्र २०२४ विधानसभा निवडणुकीत जायंट किलर शंकर मांडेकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर संग्राम थोपटेंना चितपट केलं आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. या निवडणुकीत थोपटेंचा सुमारे २० हजार मतांनी पराभव झाला होता.

सुमारे ४० वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व थोपटे कुटुंबीयांनी केला आहे. संग्राम थोपटे यांच्या आधी त्यांचे वडील आनंदराव थोपटे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलं होतं. भोर-मुळशी- वेल्हा मतदारसंघ आणि थोपटे कुटुंबीय हे एक समीकरणच बनलं होतं. मात्र या विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आणि काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार असताना थोपटे यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती मात्र तसं होऊ शकलं नाही त्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदीतरी वर्णी लागेल यासाठी थोपटे प्रयत्न केले होते असं बोललं जातं मात्र ती ही संधी हुकली त्यानंतर पुढे विधानसभेला सामोरे जात असताना थोपटे काँग्रेसवर नाराज आहेत ते निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये जातील अशाही चर्चा रंगल्या होत्या मात्र तसं काहीच झालं नाही आणि थोपटे काँग्रेसमध्येच राहिले आणि निवडणूक लढले मात्र त्यांना यावेळी अपयश आलं. आता थोपटे आपल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थोपटेंच्या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रात आणि एकूणच महाराष्ट्र काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. तर आता काँग्रेसला पुणे जिल्ह्यात आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर दुसरीकडे आता थोपटे यांना थांबवण्यासाठी काँग्रेस श्रेष्ठ फिल्डिंग लावतात की थोपटे आपला निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, त्यांच्याशी याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.