पुणे, दि. ७ डिसेंबर २०२३ – जीवनात येणाऱ्या कठीण, आव्हानात्मक प्रसंगी प्रतिक्रिया न देता, प्रतिसाद द्यायला शिकवणारे आणि तारून नेणारे मंत्र रविबाला काकतकर यांच्या पुस्तकात संग्रहित केले आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके यांनी आज केले.
प्रफुल्लता प्रकाशन प्रकाशित आणि प्रसिद्ध समुपदेशक व एनएलपी प्रशिक्षक रविबाला काकतकर लिखित ‘आत्मसामर्थ्य : मंत्र प्रतिसादांचा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. प्रफुल्लता प्रकाशन व काकतकर परिवार यांच्या वतीने एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या समारंभात डॉ. लुकतुके, डॉ मोहन आगाशे यांच्या हस्ते आज या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. मंजिरी लाटे, डॉ हिमांशू भट नवांगुळ हे देखील यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. लुकतुके म्हणाले, “जन्माला आल्यापासून झालेल्या संस्कारांचे आपण अंकित असतो. बुद्धी हे संस्कार ग्रहण करून साठवते, योग्य वेळी आठवते आणि वापर करायला प्रेरित करते. साद प्रतिसादाची कृती शिकवते. घातलेल्या सादेला अतिशय मैत्रीपूर्ण, हृद्य असा दिलेला प्रतिसाद म्हणजे हे पुस्तक आहे. लेखिकेने अतिशय सोप्या, प्रवाही भाषेत केलेले संभाषण या पुस्तकात आहे. आपल्यातील कारक शक्तीचा विकास आणि त्या उर्जेचे व्यवस्थापन या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात कथन केले आहेत.” हृदयाच्या अंतर्गामी नेणारे हे लेखन आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. आगाशे यांनी आधुनिक काळातील औपचारिक शिक्षण केवळ बौद्धिक मेंदूचा विकास करण्यासाठी आहे, पण मानवी संवेदनांशी निगडीत मेंदूच्या विकासासाठी साद – प्रतिसाद ही प्रक्रिया योग्य आहे. बुद्धी कमी- जास्त असू शकते, त्यामुळे बौद्धिक दहशतवाद निर्माण होण्याचा धोका संभवतो, असे मत मांडले.
लेखिकेने या पुस्तकात भावना कशा ओळखायच्या, ताब्यात कशा ठेवायच्या, भावनांचे व्यवस्थापन कसे करायचे, याचे भान जागविण्याचे मंत्र सांगितले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रेक्षकांशी संवाद साधताना लेखिका रविबाला काकतकर म्हणाल्या, “देहबोली, उच्चारल्या जाणाऱ्या शब्दांतील चढउतार आणि ज्ञानेंद्रियांचे सामर्थ्य यांचे निरीक्षण करून संवादासाठी उपयुक्त ठरणारा तंत्रसमुच्चय न्यूरो लिग्विस्टिक प्रोग्रमिंग (एनएलपी) हा प्रवाह जागतिक पातळीवर वापरला जात आहे. त्याचा समुचित वापर या पुस्तकाच्या लेखनात केला आहे. बाह्य परिस्थितीला सामोरे जाताना, ती परिस्थिती, व्यक्ती, घटना आणि तिला तोंड देणाऱ्या अंतर्गत क्षमता, यांच्यातील असमतोल दूर करून, क्षमतांची यथायोग्य जाणीव करून देण्याचे काम हा प्रवाह करतो. तसेच ताण, दडपणांचे व्यवस्थापन करण्यासाठीही त्याला थेट भिडण्याची मानसिकता जागृत करण्याचे कार्य याद्वारे केले जाते, असेही त्या म्हणाल्या.
मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तसेच काकतकर यांच्याशी संवाद साधला. अलका काकतकर यांनी परिचय करून दिला. हिमांशु भट नवांगुळ यांनी स्वागत केले. वीणा भावे यांनी आभार मानले.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन