ऑनलाईन अ‍ॅपद्वारे ओळख करून तरुणाशी जवळीक साधून पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल

पुणे, ०९/०१/२०२३: स्टारमेकर या ऑनलाईन अ‍ॅपद्वारे पुण्यात राहणाऱ्या एका तरुणाशी ओळख करून त्याच्याशी प्रेमाचे नाटक करत, मुंबईत राहणाऱ्या एका तरुणीने त्याचाशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तरुणाला बदनामी करण्याची व आत्महत्या करुन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तरुणीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती सोमवारी दिली आहे.
याप्रकरणी पुण्यातील येरवडा परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षाच्या तरुणाने आरोपी तरुणी विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुंबईतील कळंबोली येथील एका ३० वर्षाच्या तरुणीवर फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकार जून २०२१पासून अतापर्यंत सुरु होता.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण व आरोपी तरुणी यांची स्टार मेकर या ऑनलाईन अ‍ॅपद्वारे काही दिवसांपूर्वी ओळख झाली. त्यानंतर तिने
त्याच्या पुण्यातील घरी तिचे येणे-जाणे सुरु झाले. त्याचा विश्वास संपादन करून त्यातून त्याचे सोबत तिने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याची फसवणूक करुन तरुण व त्यांचे नातेवाईकांचा मानसिक छळ केला.
 तक्रारदार याचे ऑफिसमधील लोकांकडे व नातेवाईकांकडे बदनामी करेल, तुझ्याविरुद्ध खोटी तक्रार करुन तुला व तुझ्या घरच्यांना कोणत्याही गुन्ह्यात अडकवून टाकेन, मी आत्महत्या करेल, अशी धमकी देऊन वारंवार त्याच्याकडे पैशांची मागणी करून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र, तरुणी फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्याने या तरुणाने पोलिसांकडे तरुणी विरोधात तक्रार दाखल केली. याबाबत येरवडा पोलीस पुढील तपास करीत आहेत.