दिवसाढवळ्या कोयत्याच्या धाकाने लुटमार करणाऱ्या सराईत टोळीला अटक

पुणे, दि. २१ मे २०२१: शहरातील विविध भागात दिवसाढवळ्या नागरिकांसह वाहनचालकांना कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या सराईत टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल, दुचाकी, टीव्ही असा मिळून ४ लाख ६८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अभिजीत उर्फ दादया अशोक रणदिवे (वय २१), सतीश आण्णाजी केदळे (वय ३२, दोघेही रा. हडपसर), आणि नोएल ऐलेन शबान (वय २०, रा. कोरेगाव पार्क ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हडपसर परिसरातील नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. मागील काही दिवसांपुर्वी टोळीने दिवसाढवळ्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून दागिने चोरले होते. याप्रकरणा पोलिस तपास करीत असताना, लुटमार करणारे आरोपी हडपसरमधील म्हाडा कॉलनी परिसरात येणार असल्याची माहिती तपास पथकाचे शाहिद शेख आणि शशिकांत नाळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अभिजीत आणि सतीशला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी साथीदार नोएलच्या मदतीने बंडगार्डन, हडपसर, वानवडी, कोंढवा, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांसह मॉर्निंग वॉकला जाणाऱ्याना लुटल्याची कबुली दिली.

तिन्ही सराईत आरोपींकडून २४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय सोन्याचे दागिने, दुचाकी, टीव्ही असा मिळून ४ लाख ६८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सराईतांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शाहिद शेख, अकबर शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांच्या पथकाने केली.