पोलीस कर्मचाऱ्याने महिला कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

पुणे, २५ ऑगस्ट २०२२:  ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याने शहर पोलीस दलातील एका महिला कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर, तिचे अर्धनग्न फोटो मित्रांना दाखवून तिची बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तिला मारहाणकरत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. याप्रकरणी संदिप कुंडलिक जाधव (वय २८, रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत २३ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २०२० ते २०२२ या कालावधीत घडला आहे. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.

 

तक्रारदार पुणे शहर पोलीस दलात पोलीस शिपाई आहेत. तर, संदीप हा पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई आहे. त्यांची ओळख होती. ओळखीनंतर संदीपने तरूणीशी लग्न करण्याचा बहाणा केला व तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच, तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार देखील केले. यादरम्यान, त्याचे इतर मुलींशी देखील अनैतिक संबंध होते. त्याबाबत विचारणा केल्यानंतर तो तरुणीला मारहाण करत होता. तिच्याशी विवाह न करता तिची फसवणूक केली. तर वारंवार मारहाणकरून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तिचे अर्धनग्न फोटो काढून ते मित्रांना दाखवत बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सतत होणाऱ्या त्रास व लग्न करत नसल्याने या तरुणीने खडक पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत संदिपला अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. अधिक तपास महिला उपनिरीक्षक पवार या करत आहेत.