ओरिगामी संबंधी ‘ओरु’ या जुन्या मासिकांचा संच पुण्यातील अभ्यासकांसाठी उपलब्ध

पुणे,  दि. ५ जानेवारी, २०२२ :१९९३ च्या सुमारास जपानमध्ये प्रकाशित होणा-या ‘ओरु’ या ओरिगामी कलेसंबंधीच्या विशेष मासिकांचा संच आता पुण्यातील ओरिगामी व जपानी भाषा शिकणा-या विद्यार्थ्यांना उपलब्ध झाला आहे. पुण्यातील ओरिगामी मित्र संस्थेच्या सदस्या व जपानी भाषेच्या दुभाषी असलेल्या स्वाती धर्माधिकारी यांच्या प्रयत्नांमधून या मासिकांचा संच उपलब्ध झाला असून ओरिगामीच्या डिझाईन्स, फोल्डिंग टेक्निक्स, फोटो यांबरोबरच सुप्रसिद्ध ओरिगामी मास्टर्स यांचे जपानी भाषेतील लेख यांचा समावेश या मासिकाच्या संचात आहे.

भारतीय वंशाचे जपानी राजकारणी व पहिल्यांदा जपानमध्ये निवडणूक जिंकलेले योगेंद्र पुराणिक अर्थात योगी सान यांनी एका अनौपचारिक कार्यक्रमात नुकताच हा संच धर्माधिकारी यांकडे सुपूर्त केला. यासाठी धर्माधिकारी गेल्या अनेक वर्षे प्रयत्न करीत होत्या मात्र या मासिकांचे प्रकाशन बंद झाल्याने तो उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र संपूर्ण संच ऑनलाईन उपलब्ध झाल्यानंतर योगी सान यांच्या पुढाकाराने त्यांनी लागलीच तो खरेदी करत स्वाती धर्माधिकारी यांना भेट स्वरूपात सुपूर्त केला.

याविषयी अधिक माहिती देताना स्वाती धर्माधिकारी म्हणाल्या, “ओरू हे मासिक जपानमध्ये १९९३ ते १९९७  दरम्यान जपानी भाषेत प्रकाशित केले जायचे. केसरीवाड्यात याच दरम्यान इंदूताई टिळक यांकडे ओरिगामी शिकत असताना ही मासिके पाहिल्याचे आठवते. ओरिगामी विषयातील प्रसिद्ध मासिक अशीच त्यांची ओळख होती. यामधील ओरिगामी कलेसंदर्भातील माहिती ही अमूल्य असून पुण्यातील ओरिगामी व जपानी शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी ती उपयुक्त आहे. यामध्ये असलेली ओरिगामी मॉडेल्सची उत्तम छायाचित्रे हे मासिकाचे वैशिष्ट्ये आहे. २५ वर्षांपूर्वी या मासिकाचे प्रकाशन बंद झाल्याने योगी सान यांनी दिलेली ही भेट अमूल्य आहे. ही मासिके अतिशय दर्जेदार असून त्यांची छपाई व त्यातील माहिती उच्च दर्जाची आहे. या मासिकांचा उपयोग ओरिगामी आणि जपानी अभासकांना नक्की होईल.”

ओरिगामी मित्रचे नव्याने सुरू झालेले तिसरे सेंटर, पिंपरी चिंचवड भागातील नवी सांगवी येथे असून स्वाती धर्माधिकारी यांच्या नवी सांगवीतील युनिक या ओरिगामी मित्रच्या शाखेमध्ये सदर मासिकांचा संच विद्यार्थी व इच्छुकांना पहाण्यास उपलब्ध असेल