सायबर चोरट्याकडून महिलेला साडेसहा लाखांचा गंडा, परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष

पुणे, ०१/११/२०२२: परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलेला सायबर चोरट्याने साडेसहा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेला काही महिन्यांपूर्वी अनोळखी व्यक्तीने मैत्रीची विनंती पाठविली होती. महिलेने शहानिशा न करता मैत्रीची विनंती स्विकारली. त्यानंतर त्यांच्यात संवाद वाढला. परदेशातील एका खासगी कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी चोरट्याने केली होती. परदेशातून महागड्या भेटवस्तू पाठविण्याचे आमिष त्याने महिलेला दाखविले. त्यानंतर नेहा शर्मा नावाच्या महिलेने तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.

परदेशातून पाठविलेल्या भेटवस्तुंचे खोके (पार्सल) विमानतळावर सीमाशुल्क विभागाने (कस्टम) ताब्यात घेतले आहे. तातडीने काही रक्कम भरावी लागणार असल्याचे शर्माने महिलेला सांगितले. त्यानंतर महिलेने तातडीने एका बँक खात्यात पैसे जमा केले. त्यानंतर पुन्हा निरनिराळी कारणे सांगून आरोपींनी महिलेकडून पुन्हा पैसे घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली.