लोणावळयाचे तत्कालीन नगराध्यक्ष राजू चौधरी हत्येप्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता

पुणे, १५ जुन २०२१: लोणावळा नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष मयत राजू चौधरी यांच्या हत्त्येप्रकरणी सुमित प्रकाश गवळी व जफर शेख यांची मुंबई उच्च न्यायलयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

 

दिनांक २६.०५.२००९ रोजी लोणावळा नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष राजू चौधरी यांची दिवसाढवळ्या नगरपालिकेमध्ये हत्या करण्यात आली होती. सदर प्रकरणामध्ये आरोपी सुमित गवळी व जफर शेख यांनी हत्या केल्याबाबत त्यांचे नाव आले होते. सदर प्रकरणी मुख्य तक्रारदार यांनी वरील आरोपींची नावे दिल्या कारणाने सदर प्रकरण हे जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे येथे चालवण्यात आले होते. सदर प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे यांनी त्यांच्या आदेश दि. २७.०४.२०१२ नुसार सुमित प्रकाश गवळी व जफर शेख यांना कलम 302, 34 नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

 

या शिक्षेविरोधात आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी अपील त्यांचे ॲड. श्री. शैलेश धनंजय चव्हाण यांचे मार्फत दाखल केले होती. सदर अपिलाची अंतिम सुनावणी ही न्या.श्रीमती साधना जाधव व न्या. श्री. एन. एम. बोरकर यांच्या खंडपीठासमोर दि. 17/3/2021 चालवण्यात आली होती. सदर प्रकरणी अंतिम निकाल दि. ०७.०६.२०२१ रोजी देण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये सुमित प्रकाश गवळी व जफर शेख यांची पूर्ण पुरावे आणि साक्षिंची फेरतपासणी करून गुन्हयामध्ये सहभाग असल्याचे सिद्ध होत नसल्याकारणाने निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हे आरोपी गेल्या 12 वर्ष पासून शिक्षा भोगत होते. तसेच सदर प्रकरणामध्ये सरकार तर्फे निर्दोष आरोपी अमित प्रकाश गवळी व प्रकाश गवळी विरोधात सादर केलेले अपील देखील माननीय उच्च न्यायालयाने रद्दबातल केले आहे. या प्रकरणी आरोपी यांच्या वतीने ॲड. शैलेश धनंजय चव्हाण व ॲड. विशाल खटावकर यांनी काम पाहिले.