पुणे, दि. २९ (प्रतिनिधी) – पोलिसाचा गणवेश घालून विश्वास संपादित करून तोतयाने एका कुटूंबातील तरूणांसह तरूणींना कस्टमध्ये नोकरीच्या बहाण्याने तब्बल ५१ लाख १८ हजारांचा गंडा घातला. ही घटना २०१७ ते जून २०२१ कालावधीत घडली. याप्रकरणी तोतया पोलिस राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४३, रा. काळेपडळ, हडपसर) याला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्याची सहकारी सुलोचना दादू सोनवणे (वय ३७, रा. विश्रांतवाडी) गुन्हा दाखल केला आहे. दीपक मुंदडा (वय ५१, रा. शनिवार पेठ) यांनी तक्रार दिली आहे.
दीपक आणि राजेंद्र यांची २०१७ मध्ये ओळख झाली होती. त्यावेळी राजेंद्रने पोलीस असल्याचे सांगत दीपक यांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर झालेल्या भेटीवेळी राजेंद्रने पोलीस गणवेश परिधान करून दीपक यांच्यासोबत ओळख वाढविली. त्यानंतर सुलोचना यांच्या मदतीने दीपक यांची फसवणूक करण्याच्या हेतूने कस्टममध्ये ओळख असल्याचे सांगितले. त्याठिकाणी दीपक यांचा मुलगा, भाचा आणि पुतण्याला नोकरी लावतो, असे सांगितले. त्यासाठी राजेंद्रने त्यांच्याकडून वेळोवेळी तब्बल ५१ लाख १८ हजार रूपये घेतले. मात्र, चार वर्षांत कोणालाही नोकरीला लावले नाही. फसवणूक झाल्यानंतर दीपक यांनी पोलिसांकडे धाव घेउन तक्रार केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत तपास करीत आहेत.
More Stories
जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर यांना राष्ट्रीय पुरस्कार
पुण्यात पोलीस ठाण्यातच महिलेने प्यायले फिनाईल, आयुक्तालयानंतर कोंढव्यात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे: शहरात वेगवेगळ्या अपघातात तीन ठार, सहकारनगर,वाघोलीत अपघात