पुणे: सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगत केले जेष्ठाचे अपहरण, दीड लाखांची मागितली खंडणी

पुणे , १६/०८/२०२१: केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) चे अधिकारी असल्याचे सांगत जेष्ठाला मारहाण करून घरातील ऐवज घेत जबरदस्तीने मोटारीत बसविले. त्याच्याकडे दीड लाखांची खंडणी मागत खेड शिवापूर परिसरात सोडून दिल्याची घटना कोरेगाव परिसरात घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अपहरण व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिलिंद महादेव भोंगाळे (वय ६३, रा. ड्रीम्स निवारा, कोरेगाव ता. हवेली) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार रेश्मा शेख (रा. लोणी काळभोर) व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी भोंगळे यांच्या घरी आरोपी शेख व इतर काहीजण आले होते . त्यांनी फिर्यादिला सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी केली. त्यांनतर ते तक्रारदार यांच्या घरामध्ये घुसून लॅपटॉप, मोबाईल, मोटारीचे स्टार्टर, बँकेची कागदपत्रे असा ३१ हजार रूपये घेतला. तक्रारदार यांना मारहाण करून जबरदस्तीने मोटारीत बसवुन मारहाण केली. त्यांच्याकडे दीड लाख रूपयांची खंडणीची मागणी केली. तसेच, पैसे न दिल्यास खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. भोंगाळे यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना खेड शिवापूर भागात घेऊन गेले. त्याठिकाणी सोडून देत त्यांच्या घरातून घेतलेले ३१ हजार रूपयांचा साहित्य आरोपी घेऊन गेले. तक्रारदार यांनी त्या ठिकाणी घरी येत पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे