अतिरिक्त आयुक्त विलास कानडे सेवानिवृत्त

पुणे, 03 ऑक्टोबर 2022 ः पुणे महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) विलास कानडे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. १९८५ मध्ये महापालिकेत लघुलेखक पदावर
रुजू झालेले त्यानंतर बढती होत सर्वात शेवटी अतिरिक्त आयुक्त पदापर्यंत अशी ३७ वर्ष कानडे यांनी महापालिकेत सेवा केली. तसेच कानडे व त्यांच्या पत्नी बांधकाम विभागातील प्रशासन अधिकारी वनिता कानडे हे दोघे एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले.

विलास कानडे हे जकात विकास प्रमुख असताना जकात रद्द होऊन त्याऐवजी एलबीटी ही नवी करप्रणाली आली. त्याची त्यांनी यशस्वी अंमलबजावणी केली. काही वर्षांनी एलबीटी रद्द होऊन जीएसटी आला. केंद्र शासनाकडून एलबीटीच्या उत्पन्नाचा आधार घेऊन जीएसटीची रक्कम दिली जाते. त्यामुळे कानडे यांच्या काळात एलबीटीत विक्रमी उत्पन्न मिळाल्याचा फायदा पुणेकरांना होत आहे. तसेच मिळकतकर विभागातही कानडे यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्याने कामात पारदर्शकता निर्माण होऊन महापालिकेचे उत्पन्न २१०० कोटीच्या पुढे गेले.