अस्मयच्या हॅटट्रिकने लौकिक एफएचा विजय पीडीएफए फुटबॉल

पुणे, 16/5/2022 – पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या लीग मोसमात आज १६ वर्षांखालील गटात अस्मय गायकवाडच्या जबरदस्त हॅटट्रिकच्या जोरावर लौकिक एफए संघाने दणदणीत विजयाची नोंद केली. दुर्गा स्पोर्टस अकादमीनेही तृतिय श्रेणी गटात मोठ्या विजयाची नोंद केली. आज दिवस भरात विविध सामन्यातून तीन हॅटट्रिक नोंदवल्या गेल्या.

 

एसएसपीएमएसच्या मैदानावर झालेल्या सामन्यात लौकिक एफए संघाने ब्लॅक हॉक्स एफसीचा ५-१ असा पराभव केला. सोहम सागरने आठव्याच मिनिटाला लौकिकचे खाते उघडले. या पहिल्या गोलपासून त्यांनी सामन्याला दिलेला वेग आणि वर्चस्व कधीच सोडले नाही. त्यानंतर अस्मय गायकवाडने ११, २४ आणि २८व्या मिनिटाला गोल करून शानदार हॅटट्रिक नोंदवली. या दरम्यान शशांक सी याने एक गोल करत ब्लॅक हॉक्सचे खाते उघडले. पण, यानंतर त्यांना काहीच करता आले नाही. विश्रांतीनंतर ५३व्या मिनिटाला ध्रुव राऊतने आणखी एक गोल करत लौकिकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

 

दरम्यान, सप. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या तृतिय श्रेणीतील सामन्यात दुर्गा स्पोर्टस अकादमी संघाने ब्लॅक हॉक्सचे आव्हान ५-१ असे परतवून लावले. त्यांचे पाचही गोल पूर्वार्धात झाले. सामन्याच्या ८व्या मिनिटाला बी. प्रमोद याने दुर्गा अकादमीसाठी पहिला गोल नोंदवला. त्यानंतर मयूरने २३ आणि ३६व्या मिनिटाला गोल करून आघाडी वाढवली. एकच मिनिटांनी ३७व्या मिनिटाला अबिशा बालने गोल नोंदवला, तर पाठोपाठ ३८व्या मिनिटाला कार्तिकने आपला वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून दुर्गा अकादमीचे वर्चस्व भक्कम केले. उत्तरार्धात दुर्गा अकादमीकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत. पण, त्यांनी सामन्यावरील पकडही निसटू दिली नाही. सामन्याच्या ५७व्या मिनिटाला त्यांनी पहिली गोल स्विकारला. ब्लॅक हॉक्सच्या हृषिकेश कांबळे याने ५७व्या मिनिटाला हा गोल केला.

 

तृतिय श्रेणी गटात आदित्य चव्हाणने (१०वे , १८वे, ५६वे मिनिट) नोंदवलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर गोल्डन फेदर संघाने थंडर कॅटसचा ४-० असा पराभव केला. अन्य एक गोल अभिषेक झा याने केला.

 

आजच्या दिवसातील तिसरी हॅटट्रिक १६ वर्षांखालील गटात झाली. सागर जगतापच्या (५वे, ३२वे आणि ४५वे मिनिट) हॅटट्रिकच्या जोरावर मॅथ्यू एफए क्लबने ४लायन्सचा ५-० असा पराभव केला. अन्य दोन गोल उमेर खान आणि अनिकेत गवारे यांनी केले.

 

निकाल –

 

सप महाविद्यालय मैदान – द्वितीय श्रेणी

जाएंटस एफसी २ (निखिल शेलार २३वे, जीवन नलगे ३६वे मिनिट) वि.वि. लायन्स पीसीएच ०

बोपोडी एसए १ (डॉमिनिक रोझरी ५२वे) वि.वि. राहुल एफए ०

 

एसएसपीएमएस मैदान – १६ वर्षांखालील युवा लिग –

यंग स्टेप्स अकादमी ३ (वेद पारटे ४६वे, अथर्व आडावकर ५१वे मिनिट, ध्रुव राऊत ५३वे मिनिट) वि.वि. रायन एफए २ (रुतुराज भोर ४१वे, श्रीनिवास पुजारी ५३वे मिनिट)

लौकिक एफए ५ (सोहम सागर ८वे मिनिट, अस्मय गायकवाड ११वे, २४वे, २८वे मिनिट, आरुष वानखेडे ५२वे मिनिट) वि.वि. ब्लॅक हॉक्स एफसी १ (शशांक सी २४वे मिनिट)

उत्कर्ष क्रीडा मंच २ (अनिकेत अवघडे ३१वे , ३८वे मिनिट) वि.वि. पुणे पायोनिर्स १ (अथर्व खडतरे ३५वे मिनिट)

मॅथ्यू एफए ५ (सागर जगताप ५वे, ३२वे, ४५वे मिनिट, उमेर खान ११वे, अनिकेत गवारे २२वे मिनिट) वि.वि. ४ लायन्स ०

गेम ऑफ गोल्स (जीओजी) ७ (अपुर्व बी ८वे, ५२वे, नीलकांत मोरे ३६वे, सोहम चांदपुरे ४०वे, रणवीर बायस ६०+१ले, ६०+२रे मिनिट) वि.वि. बेटा एससी ०

 

सप महाविद्यालय मैदान – तृतिय श्रेणी

गोल्डन फेदर ४ (आदित्य चव्हाण १०वे, १८वे, ५६वे मिनिट, अभिषेक झा ६५वे मिनिट) वि.वि. परशुरामियन्स सी २ (आयन शेख २१वे, वेदांत मोटे ६१वे मिनिट)

एएफए सॅनफोर्ड २ (एडविन एस, १४वे, ६०वे मिनिट) वि.वि. थंडरकॅटस बी ०

दुर्गा स्पोर्टस अकादमी ५ (प्रमोद बी ८वे, ३८वे मिनिट, मयुर डब्ल्यू २३वे, ३६वे, अबिशा पाल ३७वे मिनिट) वि.वि. ब्लॅक हॉक्स १ (हृषिकेश कांबळे ५७वे मिनिट-पेनल्टी)

पुणे पायोनिर्स एसी १ (कार्तिक बी ४४वे मिनिट) वि.वि. कमांडोज एफसी ०.