December 19, 2025

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन ‘तत्पर मोड’ वर; संपूर्ण तयारी सुरू

पुणे, १७ डिसेंबर २०२५ : राज्य निवडणूक आयोगाने पुणे महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केल्यानंतर महापालिका प्रशासन तत्काळ ‘अॅक्शन मोड’ मध्ये आले आहे. उमेदवारांसाठी एक खिडकी योजना, आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कारवाईसाठी विशेष पथके, उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवणारी स्वतंत्र यंत्रणा, तसेच मतदारयादी वितरणापासून मतदान प्रक्रियेच्या अंमलबजावणीपर्यंतचे सर्व नियोजन प्रशासनाने सुरू केले आहे.

चार वर्षांच्या प्रशासक राज्यानंतर महापालिका निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार असून निकाल दुसऱ्या दिवशी जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर महापालिका प्रशासनाने निवडणूक पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी केली आहे, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांचा समावेश असलेली निवडणूक नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रचार फेऱ्या, सभा व उमेदवारांचा खर्च यावर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडिओग्राफी सर्व्हेलन्स पथके कार्यरत राहतील. आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कारवाईसाठी भरारी पथके तर मतदारांना प्रलोभन देण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चेकपोस्ट पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

उमेदवारांना ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) सहज मिळावे यासाठी एक खिडकी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली असून, कर थकबाकी नसल्यास २४ तासांत एनओसी देण्यात येणार आहे. अर्जासाठी nocelection.pmc.gov.in या संकेतस्थळाचा उपयोग करता येईल.

निवडणुकीसाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. १३,२०० बॅलेट युनिट व ४,४०० कंट्रोल युनिट या प्रत्येक मतदान केंद्रावर बसविण्यात येणार असून संवेदनशील केंद्रांवर पोलिसांच्या मदतीने विशेष लक्ष ठेवले जाईल. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदार जागृतीवरही महापालिकेचा भर राहणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक शांततापूर्ण, पारदर्शक आणि काटेकोरपणे राबवली जाईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.