बॅकलॉगच्या विषयात उत्तीर्ण झाल्यानंतरच पुढील वर्षात प्रवेश, पुणे विद्यापीठाचे स्पष्टीकरण

पुणे, २५/११/२०२१: गेल्यावर्षी कोरोनाची लाट असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सर्वांना सरसकट पुढच्या वर्षामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी बॅकलॉग असलेल्या विषयाबद्दल सवलत देण्यात आली होती. मात्र, आता गेल्यावर्षीच्या बॅकलॉग या विषयांची परीक्षा नोव्हेंबर २०२१ च्या प्रथम सत्र परीक्षेत द्यावी लागणार आहे. यामध्ये उत्तीर्ण झाल्यास शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये पात्र ठरले जाणार आहे. असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच गुणपत्रिका विद्यार्थ्यांचा फोटो छापला जाणार असल्याने महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या फोटोची खातरजमा करून चांगल्या दर्जाचा फोटो विद्यापीठाकडे पाठवून द्यावा अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आलेल्या आहेत.

 

परीक्षा मंडळाचे संचालक डॉक्टर महेश काकडे यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे.

 

कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अहित होऊ नये या उद्देशाने सध्या पुढील वर्गात प्रवेशासाठी अर्हता प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांना एक संधी देण्याचे विद्यापीठ अधिकार मंडळाने यापूर्वी निश्चित केलेले होते. सदर बाबीस फक्त या सत्रापुरतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार सदर विद्यार्थ्यास पुढील वर्गात तात्पुरता प्रवेश (प्रोव्हिजनल ऍडमिशन) देणेबाबत महाविद्यालयांनी कार्यवाही करावी. अशा विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर/नोव्हेंबर, २०२१ च्या परीक्षेत त्यांच्या अनुशेषित (बॅकलॉग) विषयांची परीक्षा द्यावी. या परीक्षेत अनुशेषित विषयांसाठी परीक्षा दिल्यानंतर जर विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात प्रवेशासाठी प्रचलित पध्दतीनुसार अर्हता प्राप्त केल्यास, अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२१- २२ च्या व्दितीय सत्राच्या परीक्षेचे आवेदनपत्र भरताना, त्यांच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चा प्रवेश कायम झालेल्या अभ्यासक्रमाच्या प्रथम व व्दितीय

सत्रांच्या परीक्षांचे आवेदनपत्र एकत्रित भरण्याची संधी दिली जाईल व या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही. संबंधित विद्यार्थ्यांना व संलग्नित महाविद्यालयांना या पत्राव्दारे कळविण्यात येत आहे की, अर्हताप्राप्त न झालेल्या अभ्यासक्रमांचे परीक्षा आवेदनपत्र विद्यार्थ्यांना भरता येणार नाही. त्याकरिता विद्यार्थी/संस्थांनी याबाबत मागणी करु नये. तसेच महाविद्यालयांनी असे परीक्षा आवेदनपत्र इनवर्ड करु नयेत. याबाबतीत काही चुका विद्यार्थी अथवा महाविद्यालयांकडून झाल्यास हे प्रकरण प्रमाद समितीसमोर पाठविण्यात येईल

याची नोंद घ्यावी.

 

कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयात शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसलेल्या विषयांची निवड केलेली होती. त्यामुळे निकाल प्रक्रिया राबविताना महाविद्यालय व परीक्षा विभागास अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. विद्यार्थ्यांनी योग्य विषय निवडणे आवश्यक राहील व महाविद्यालयांनी परीक्षा आवेदनपत्र इनवर्ड करतांना याबाबत खातरजमा करणे आवश्यक राहील, याची नोंद घ्यावी.

 

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर फोटोछपाई करण्याची सुविधा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुरु करणेचे नियोजित आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज (५१ एमएम X ५१ एमएम)

प्लेन व्हाईट बॅकग्राऊंडवरील असा स्वच्छ व उत्तम दर्जाचा असावा. सदर फोटो महाविद्यालयातील संबंधित विद्यार्थ्याचा आहे याबाबत महाविद्यालयांनी खातरजमा करुन घ्यावी, त्यानंतरच हा फोटो वेबपोर्टलवर अपलोड करावा असे काकडे यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.