हिंजवडी मेट्रोचे काम आठ दिवसांत सुरु करा, अन्यथा आंदोलन: भाजप नेत्यांचा इशारा

पुणे, 8/11/2021 – हिंजवडी ते शिवाजीनगर या प्रस्तावित मेट्रो मार्गाचे काम येत्या आठ दिवसांत सुरू न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपचे खासदार गिरीश बापट, आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सुनीता वाडेकर आदींनी निवेदनाद्वारे पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांना आज (सोमवारी) दिला.

 

खासदार गिरीश बापट, आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांना आज (सोमवारी) भेटून निवेदन दिले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहराला जोडणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर अशा मेट्रो मार्गाचे काम अनेक वर्षे प्रलंबित आहे. हे नियोजित वेळेत पूर्ण न झाल्यास अतिरिक्त खर्च वाढणार आहे आणि त्याचा भुर्दंड पुणेकरांना सोसावा लागेल, असे भाजप नेत्यांनी पीएमआरडीएला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हिंजवडी या आयटी क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या लवकर सोडविण्यासाठी मेट्रोचे काम लवकर होणे आवश्यक आहे, याकडेही निवेदनाद्वारे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

 

प्रस्तावित मेट्रो मार्गासाठी ९८ टक्के जागा ताब्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरु करावे. तसेच ज्या उर्वरित शासकीय जागा ताब्यात आलेल्या नाहीत त्या तातडीने ताब्यात घेऊन पुढील आठ दिवसांत मेट्रोचे काम सुरु करावे. अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजप नेत्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.