गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत सर्बियाच्या अलेक्झांडर डस्कालोविक, फ्रांसच्या मार्गोट फंथाला यांना विजेतेपद

पुणे,दि.3 डिसेंबर 2022: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात फ्रांसच्या मार्गोट फंथाला हिने तर, मुलांच्या गटात अलेक्झांडर डस्कालोविक यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम फेरीत फ्रांसच्या सातव्या मानांकित मार्गोट फंथाला हिने तिसऱ्या मानांकित पुण्याच्या मधुरिमा सावंतचा 5-7, 6-1, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. हा सामना २ तास ५ मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये मार्गोटने मधुरिमाची पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत सामन्यात आघाडी घेतली. पण सहाव्या गेममध्ये मधुरिमाने मार्गोटची सर्व्हिस रोखली व सामन्यात बरोबरी साधली. या सेटमध्ये मधुरिमाने सुरेख खेळ करत मार्गोटची दहाव्या व बाराव्या गेममध्ये मार्गोटची पुन्हा सर्व्हिस रोखली व हा सेट ७-५ असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये मार्गोटने जोरदार कमबॅक करत मधुरिमाविरुद्ध हा सेट ६-१ असा जिंकून आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये मार्गोटने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवत हा सेट मधुरिमाविरुद्ध 6-2 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

मुलांच्या गटात अंतिम फेरीत सहाव्या मानांकित सर्बियाच्या अलेक्झांडर डस्कालोविक याने भारताच्या हितेश चौहानचा 7-5, 6-2 असा जिंकून विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना १ तास ३० मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये अलेक्झांडर ५-१ अशा फरकाने आघाडीवर असताना हितेशने सातव्या व नवव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व बरोबरी साधली. पण अलेक्झांडरने बिनतोड सर्व्हिस केली व बाराव्या गेममध्ये हितेशची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 7-5 असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये अलेक्झांडरने हितेशला फारशी संधी न देता हा सेट 6-2 असा सहज जिंकून विजय मिळवला.

स्पर्धेतील विजेत्यांना एमव्ही देव करंडक व 100 गुण, तर उपविजेत्यांना करंडक व 60 गुण अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे आजीव अध्यक्ष शरद कन्नमवार, एआयटीएचे सहसचिव सुंदर अय्यर, गद्रे मरीनचे विपणन विभागाचे प्रमुख संकल्प थाळी आणि एमएसएलटीएचे उपाध्यक्ष विश्वास लोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे सहसचिव गिरीश इनामदार, क्लबच्या वित्तीय विभागाचे सचिव मिहीर केळकर, क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धा संचालक आश्विन गिरमे आणि आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: एकेरी: मुले:
अलेक्झांडर डस्कालोविक(सर्बिया)[6]वि.वि. हितेश चौहान(भारत)7-5, 6-2;
मुली: मार्गोट फंथाला(फ्रांस)[7]वि.वि.मधुरिमा सावंत(भारत)[3]5-7, 6-1, 6-2.