पीएमपीएमएलकडून नागरिकांसाठी पर्यायी दूरध्वनी क्रमांकाची व्यवस्था

पुणे, दि. 27 एप्रिल 2021: पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून स्वारगेट येथील मुख्यालय क्रमांक १ येथे पर्यायी दूरध्वनी क्रमांकाची व्यवस्था म्हणून ९९२१९६०९११ या मोबाईल क्रमांकाची वायरलेस फोन सेवा नागरिकांच्या सोयीसाठी २४ तास सुरू करण्यात आली आहे. महामंडळाकडील बीएसएनएलची दूरध्वनी सेवा वारंवार खंडित होत असल्याने सदरची पर्यायी दूरध्वनी क्रमांकाची व्यवस्था करण्यात आली आहे.

महामंडळामार्फत पुणे व पिंपरी चिंचवड या दोन शहरांमध्ये प्रवासी बससेवा दिली जाते. सध्या कोविडच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बससेवा उपलब्ध आहे. तसेच महामंडळाकडून “पुष्पक” ही शववाहिनीची सेवा देखील पुरवली जाते. नागरिकांकडून पुष्पक शववाहिनी संदर्भात व अत्यावश्यक सेवेतील बसेस संदर्भात महामंडळाकडे ०२०-२४५०३२००, ०२०-२४५०३२११०२०-२४५०३२१२ या बीएसएनएलच्या क्रमांकांवरती संपर्क साधून माहिती घेतली जाते. मात्र सध्या पुणे शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे ठिकठिकाणी खोदाईचे काम असल्याने बीएसएनएलची दूरध्वनी सेवा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना महामंडळाकडे बसेस व इतर माहिती घेणे संदर्भात अडचणी येत आहेत. सदर बाब विचारात घेऊन महामंडळाकडून स्वारगेट येथील मुख्यालय क्रमांक १ येथे पर्यायी दूरध्वनी क्रमांकाची व्यवस्था म्हणून ९९२१९६०९११ या मोबाईल क्रमांकाची वायरलेस फोन सेवा नागरिकांच्या सोयीसाठी २४ तास सुरू करण्यात आली आहे. या पर्यायी दूरध्वनी क्रमांकावर नागरीक २४ तास संपर्क साधू शकतात. दरम्यान वर उल्लेख केलेले बीएसएनएलचे दूरध्वनी क्रमांक देखील सुरू आहेत.