21व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत अमर एफसी, फातिमा इलेव्हन संघांचा उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पुणे, दि.10 जानेवारी 2023: गुरू तेगबहादुर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित 21व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अमर  एफसी, फातिमा इलेव्हन या संघांनी अनुक्रमे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी) व स्वराज एफसी या संघांचा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
 
सीओईपी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अमर एफसी संघाने कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (सीओईपी) संघाचा 4-1 असा पराभव केला. सामन्यात अमर एफसीच्या आघाडीच्या फळीने पहिल्यापासूनच जोरदार चढायांना प्रारंभ केला. तिसऱ्याच मिनिटाला गौरव स्वामीनाथनने शिवम मोरेने दिलेल्या पासवर गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर तीनच मिनिटांनी यश पवारने दिलेल्या पासवर आशुतोष यादवने सुरेख ताबा मिळवत गोल करून हि आघाडी 2-0 ने वाढवली. त्यानंतर सीओईपीच्या आक्रमक फळीने जोरदार प्रतिक्रमण केले, पण अमर एफसीच्या बचावफळीने ते परतवून लावले. 37व्या मिनिटाला अमर एफसीच्या सिवन मॉंटेरोने अफलातून चाल रचत गोल करून संघाला 3-0अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वाध संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना सीओईपीच्या सिद्धार्थ हेदवोने आदित्य जोशीच्या पासवर गोल करून हि आघाडी 3-1 ने कमी केली.
उत्तरार्धातदेखील अमर एफसीच्या खेळाडूंनी आपला रंगतदार खेळ सुरु ठेवला. 58व्या मिनिटाला यश पवारने शिवम मोरेने दिलेल्या पासवर गोल करून संघाला 4-1 अशी आघाडी प्राप्त करून दिली. पिछाडीवर असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (सीओईपी) खेळाडूंनी जोरदार खेळ केला. पण त्यांचे हे आक्रमण अमर एफसीच्या खेळाडूंनी हणून पडले. सामान्यांच्या शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवत अमर एफसी संघाने सीओईपी संघावर 4-1 असा विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात एडविन अँथोनीने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर फातिमा इलेव्हन संघाने स्वराज एफसी संघाचा 1-0असा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 
अमर एफसी: 4(गौरव स्वामीनाथन 3मि.(पास-शिवम मोरे), आशुतोष यादव 6मि.(पास-यश पवार), सिवन मॉंटेरो 37मि.(पास-साहिल जगताप), यश पवार 58मि.(पास-शिवम मोरे))वि.वि.कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी): 1(सिद्धार्थ हेदवो 41मि.(पास-आदित्य जोशी));
 
फातिमा इलेव्हन: 1(एडविन अँथोनी 10मि.(पास-ऍन्सन डिसुझा)वि.वि.स्वराज एफसी: ०.