रात्रीच्या वेळी रहिवासी भागात रुग्णवाहिकांना सायरन वाजविण्यास बंदी

पुणे, 8 मे 2021: करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्णवाहिकांचा वापर वाढला आहे. मात्र अनेकदा गरज नसताना विशेषतः रात्रीच्या वेळी रुग्णवाहिका चालकाकडून हॉर्न, सायरनचा वापर केला जातो. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने, प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विनाकारण आणि रात्रीच्या वेळी रहिवासी भागात रुग्णवाहिकांना हॉर्न वाजविण्यास बंदी घातली आहे.

याबाबत कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिकांबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. रस्त्यावर गर्दी नसताना तसेच प्रामुख्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर वाहतूक नसतानाही रुग्णवाहीकांचे चालक विनाकारण हॉर्न वाजवतात व सायरन सुरु ठेवतात. यामुळे नागरीकांची झोप मोड होणे, मनामध्ये भिती निर्माण होणे, नैराश्य येणे यासारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत असून ध्वनी प्रदूषणातही वाढ होत आहे.

त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत, कार्यलयाने हा आदेश जाहीर केला असून, यापुढे पुन्हा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधीत रुग्णवाहीकेचे मालक व चालक यांच्याविरुध्द मोटार वाहन कायदयानुसार कडक कारवाई करण्यात येईल.”