September 10, 2025

समाविष्ट १६ गावांसाठी ड्रेनेज प्रकल्पाला ३२३ कोटींचा अमृत निधी

पुणे, १० सप्टेंबर २०२५ : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या १६ गावांमध्ये ड्रेनेज लाइन टाकण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. केंद्र सरकारच्या ‘अमृत योजना’ अंतर्गत या कामासाठी ३२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या एकूण २३ पैकी या १६ गावांमध्ये सध्या मूलभूत नागरी सुविधा अपुऱ्या आहेत. यामुळे ड्रेनेज व्यवस्था, एसटीपी (सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट) आदी पायाभूत सुविधांसाठी केंद्र शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली होती. त्यातील ड्रेनेज प्रकल्पास मंजुरी मिळाल्याने लवकरच कामांना सुरुवात होणार आहे.

या प्रकल्पाचा खर्च पुढील प्रमाणे विभागला जाणार आहे:
२५% केंद्र सरकार
२५% राज्य सरकार
५०% पुणे महापालिका

“प्रकल्पाचा आराखडा तयार असून, निधीअभावी निविदा प्रक्रिया रखडली होती. आता मंजुरी मिळाल्याने प्रक्रिया त्वरीत राबवली जाईल,” असे अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले.

समाविष्ट गावांपैकी म्हाळुंगे येथील टीपी स्कीममधील ड्रेनेजचे काम पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मार्फत करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

१६ गावांची यादी:

सूस, महाळुंगे, कोंढवे धावडे, न्यू कोपरे, नर्‍हे, जांभुळवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, सणस नगर, किरकिटवाडी, नांदोशी, नांदेड, खडकवासला आणि पिसोळी.

यापूर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांपैकी फुरसुंगी आणि उरूळी देवाची वगळता उर्वरित ९ गावांमध्ये ६८% (सुमारे १८० किमी) ड्रेनेज काम पूर्ण झाले आहे. लोणी परिसरातील कामासाठी केंद्रीय परवानगीही मिळाली असून, उर्वरित काम लवकरच सुरू होणार आहे.

दरम्यान, महापालिकेने १५व्या वित्त आयोगाकडे विविध प्रकल्पांसाठी निधीची मागणी केली होती. मात्र, महापालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे तो निधी अद्याप मंजूर झालेला नाही. याचा परिणाम काही प्रकल्प रखडण्यात झाला आहे, असेही अतिरिक्त आयुक्तांनी नमूद केले.