सर्वसामान्यांचे दुःख समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम अण्णाभाऊंनी केले -प्रा.डॉ.नितीन करमळकर: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान

पुणे, दि.१ ऑगस्ट, २०२१ – अण्णाभाऊ साठे यांनी सर्वसामान्यांचे दुःख त्यांच्या शाहिरीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविले असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा.डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीने शाहीर दीनानाथ साठे वाटेगावकर आणि शाहीर मुकुंद उर्फ दादा पासलकर यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच मातोश्री रमाबाई आंबेडकर मातृशक्ती पुरस्कार बाया कर्वे कोविड केअर सेंटरला प्रदान करण्यात आला. सेंटरचे प्रमुख सचिन भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यावेळी प्रा. डॉ. नितीन करमळकर बोलत होते.

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रसेनजीत फडणवीस, राजेश पांडे, अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. एन.एस.उमराणी म्हणाले, आजच्या काळात राजकीय लोकशाही सर्वत्र पोहीचली असली तरीही शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक लोकशाही सर्व स्तरापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

अशा कार्यक्रमांमुळे आजच्या पिढीपर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार पोहोचण्यास मदत होईल, असे राजेश पांडे यांनी सांगितले.

दीनानाथ साठे यांनी यावेळी ‘माझी मैना गावावर राहिली’ हे छक्कड सादर केले. पासलकर यांनीही यावेळी स्वलिखित गीत सादर केले.

यावेळी डॉ. सुनील भंडगे यांनी अध्यासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्ञानेश्वर कुंभार यांनी केले तर प्रसेनजीत फडणवीस यांनी आभार मानले.