पुणे, २५ जानेवारी २०२४ – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने, महाटेनिस फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) सहकार्याने महाराष्ट्रातील टेनिसपटूंसाठी महत्वाकांक्षी लक्ष्यवेध कार्यक्रम सुरु केल्याची घोषणा आज केली.
महाराष्ट्राच्या क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे आयुक्त सुहास दिवसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, महाराष्ट्र राज्यातील ऑलिम्पिक खेळांच्या विकासासाठी सरकारने लक्ष्यवेध या उपक्रमातून पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिम्पिक खेळांबद्दल जागरुकता वाढवणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र राज्यातून ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व वाढावे आणि ऑलिम्पिक, आशियाईसह अन्य आतंरराष्ट्रीय खेळात राज्यातील खेळाडू विजयमंचावर पोहचावेत यासाठी या उपक्रमातून प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी पत्रकारपरिषदेत प्रशिक्षक फ्रान्सिस्को मार्टिनेझ लिडोन, व्हिक्टर मोरेनो आर्गुमानेझ आदी मान्यवर उपस्थित होते.
टेनिस लक्ष्यवेध कार्यक्रमातंर्गत महाराष्ट्र शासन आणि महाटेनिस फाऊंडेशने स्पेनमधील विलेना येथील जे.सी. फेरेरो टेनिस अकादमीशी करार केला आहे. टेनिस विश्वात असलेल्या अकादमीमधून ही सर्वोत्कृष्ट अकादमी मानली जाते. टेनिसपटूंच्या गरजा ओळखून त्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आणि डब्लूटीए तसेच एटीपी या संघटनेचे अनुभवी तांत्रिक अधिकारी या अकादमीत कार्यरत असल्याची माहिती एमएसएलटीएचे चेअरमन प्रशांत सुतार यांनी दिली.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानापर्यंत मजल मारलेला आणि सध्या कार्लोस अल्कारझ याचा प्रशिक्षक असलेला ज्युआन कार्लोस फेरेरो याची ही अकादमी असून, त्यांच्याशी हातमिळवणी करताना आम्हाला आनंद होत आहे, असेही सुतार यांनी सांगितले.
ज्युआन कार्लोस फेरेरोने आतापर्यंत पाब्लो कॅरेनो, निकोलस अल्माग्रो, गुइलोर्मो गार्सिया लोपेझ यांच्यासारखे जागतिक दर्जाचे टेनिसपटू तयार केले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व खेळाडू जागतिक क्रमवारीत पहिल्या पन्नासमध्ये पोचले आहेत. महिला क्रमवारीतही पहिल्या ५०मध्ये असलेली मारियो टेसेरा टोरोफ्लोर ही देखिल फेरेरो यांनीच घडवलेली खेळाडू आहे.
आर्यन पंप्स ही कंपनी आपल्या सीएसआर कार्यक्रमाच्या माध्यमातून लक्ष्यवेध उपक्रमाला आर्थिक मदत देणार असल्याचे आर्यन्स पंप्सचेही अध्यक्ष असलेल्या सुतार यांनी सांगितले.
आर्यन पंप्सने आतापर्यंत जागतिक क्रमवारीत दुहेरीत अव्वल स्थानापर्यंत पोचलेला रोहन बोपण्णा, एकेरीतील अव्वल खेळाडू सुमित नागल, भारतातील आघाडीचा दुहेरीमधील खेळाडू अनिरुद्ध चंद्रशेखर अशा प्रथितयश खेळाडूंसह जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना प्रायोजित केले आहे.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले, हा कार्यक्रम महाराष्ट्र टेनिससाठी निश्चितपणे वरदान ठरेल. या लक्ष्यवेध उपक्रमातंर्गत ज्युआन कार्लोस फेरेरो अकादमी एमएसएलटीएला राज्यातील प्रशिक्षक आणि शारीरिक प्रशिक्षकांना क्रीडा विज्ञानाचे आधुनिक तंत्र आणि ज्ञान देऊन विकसित करण्यात मदत करेल.
संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षकांना म्हाळुंगे बालेवाडी येथे आणून जेसी फेरेरो टेनिस अकादमीत अंतर्गत प्रशिक्षण दिले जाईल. निवडलेल्या प्रशिक्षकांना पुढील प्रशिक्षणासाठी स्पेनला पाठवले जाईल.
ज्येष्ठ प्रशिक्षक आणि एमएसएलटीए प्रशिक्षक समितीचे सदस्य हेमंत बेंद्रे म्हणाले, आम्ही विविध जिल्ह्यातील प्रतिभा शोधून त्या प्रतिभावान खेळाडूंना आमच्या प्रशिक्षण योजनेत घेत आहोत. त्यांच्या वर्षभरातील प्रशिक्षण आणि प्रगतीवर लक्ष ठेवून निवडक खेळाडूंना निवासी शिबिरासाठी बालेवाडी येथे आणले जाईल.
महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी महाराष्ट्राचा हा बहुउद्देशीय कार्यक्रम आहे. आता आम्ही नियमितपणे शिबिरांसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम खेळाडू मिळवू आणि यातूनच जेसी फेरेरो टेनिस अकादमी अंतर्गत निवासी टेनिस अकादमीला सुरुवात करू.
प्रशांत सुतार पुढे म्हणाले की, वरील उपक्रमातून निवडलेल्या एमएसएलटीएच्या खेळाडूंना लक्ष्यवेध, महाराष्ट्र सरकार आणि महाटेनिस फाऊंडेशन यांचे पूर्ण प्रायोजकत्व लाभेल. यामध्ये टेनिस प्रशिक्षण, फिजिओ, प्रवासी तंदुरुस्ती प्रशिक्षक याचा समावेश असेल.
यातून पुढे महाराष्ट्रातील प्रतिभावान खेळाडूंना प्रगत प्रशिक्षणासाठी जेसी फेरेरो अकादमीत प्रशिक्षणासाठी स्पेन येथे पाठवले जाईल, असेही ते म्हणाले.
सुंदर अय्यर पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हे टेनिस खेळात आधीच पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. आमच्याकडे टेनिसमधील अनेक राष्ट्रीय विजेते खेळाडू आहेत. आता लक्ष्यवेध उपक्रमामुळे आम्ही जागतिक विजेत्यांचीही निर्मिती सुरु करू. टेनिस खेळासाठी अशी अद्भुत संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही दिवसे आणि महाराष्ट्र सरकार आणि प्रशांत सुतार यांचे आभार मानतो.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय