जातपडताळणी कार्यालयात प्रस्तावांच्या प्रतीसह उपस्थित राहण्याचे आवाहन

पुणे, 20/10/2021: मुसळधार पावसाचे पाणी शिरल्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयातील पडताळणीचे, इतर अभिलेख, संगणक आदी साहित्य खराब झाले असल्याने पडताळणीचे प्रस्ताव सादर केलेल्या अभ्यागतांनी प्रस्ताव सादर केल्याची पोहोच व त्यासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

येरवडा परिसरात 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे समिती कार्यालयातील मागील बाजूची कारागृहाची संरक्षण भिंत कोसळली. त्यामुळे पावसाचे पाणी जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात शिरले. पावसाचे पाणी रात्रभर कार्यालयात साचून राहिल्यामुळे समिती कार्यालयात जमीनीवर ठेवण्यात आलेले जात प्रमाणपत्र पडताळणीचे व इतर अभिलेख, संगणक तसेच इतर साहित्य भिजून खराब झाले आहे.

 

सध्या समिती कार्यालयातील भिजलेले अभिलेख सुकवून, यादी तयार करावयाचे कामकाज सुरु असल्याने जात प्रमाणपत्र पडताळणीचे चौकशीसाठी समिती कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांनी प्रस्ताव सादर केलेली पोहोच पावती व त्यासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या छायांकीत प्रतीसह उपस्थित रहावे, जेणेकरुन त्यांचे प्रस्ताव कार्यालयात उपलब्ध नसल्यास प्रस्तावांची पुनर्बांधणी करुन समितीमार्फत त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत कळवण्यात आले आहे.