पुणे येथे झालेल्या रोजगार मेळाव्यात 156 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान

पुणे, 20 जानेवारी 2023 : पुणे येथे आज झालेल्या रोजगार मेळाव्यात केंद्र सरकारच्या विविध 15 विभागांमध्ये नोकरी मिळालेल्या 156 उमेदवारांना केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. भारताला एक विकसित राष्ट्र बनविण्यासाठी सर्व उमेदवारांनी आपल्या नोकरीतील सेवेच्या माध्यमातून योगदान द्यायला हवे, असे आवाहन राणे यांनी यावेळी केले. सिंबायोसिस विद्यापीठाच्या विमाननगर इथल्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला.

पुढच्या काही वर्षांत असंख्य सरकारी नोकऱ्या उपलब्ध होतील, पण नोकऱ्या मिळाल्यानंतर, त्याद्वारे जनतेची सेवा करायची आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे, असे राणे म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्थेत देश पाचव्या क्रमांकावर असून आता आपल्याला तिसऱ्या स्थानावर झेप घ्यायची आहे, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असं आवाहन त्यांनी केलं.

मुख्य प्राप्तिकर आयुक्त प्रवीण कुमार यांनी या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचे स्वागत केले तर पुण्याचे प्राप्तिकर आयुक्त संग्राम गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या अखेरीस आभार मानले.