पुणे: दरोडा टाकणाऱ्या सराईतांना पाठलाग करून पकडले; कोथरूड पोलिसांची धाडसी कारवाई

पुणे, ५ जुलै २०२१- कोथरूड पोलिसांनी सराईत शिकलगिरीकर टोळीतील सराईतांच्या मुसक्या आवळल्या आहेत. बल्लूसिंग प्रभूसिंग टाक आणि उजालासिंग प्रभूसिग टाक (दोघेही रा. रामटेकडी अंधशाळेच्यामागे, वानवडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या चार साथीदारांचा शोध सुरू आहे.

कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचरत्न सोसायटीत चोरटे शिरल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला रहिवाशांनी दिली. त्यानुसार नियंत्रण कक्षाने कोथरूड पोलिसांना माहिती देऊन घटनास्थळी रवाना केले. पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके आणि बीट मार्शलांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस आल्याची चाहूल लागताच दरोडा टाकणाऱ्या सराईतांनी बिल्डींगमधून खाली उतरून पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यावर हत्याराने हल्ला केला. जिवावर उदार होऊन जिवघेण्या धारदार हत्यारानिशी असणाऱ्या बल्लूसिंगला पोलिसांनी धक्का मारून खाली पाडले. त्यानंतर दुसरा आरोपी उजाला सिंग सह याने साथीदारांसह पळ काढला. मात्र, कोथरूड पोलिसांनी एक किलोमीटरपर्यंत सराईताचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दरोडा टाकणेसाठी आवश्यक कटावण्या, लहान मोठया वेगवेगळया धारदार सुऱ्या, कटर, गाडी असा ऐवज जप्त करण्यात आला .

आरोपी बल्लूसिंग याच्याविरूध्द ६३ गुन्हे दाखल आहेत. तर त्याचा साथीदार उजालासिंग याचेविरूध्द ७२ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडयाचा प्रयत्न, घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, एसीपी गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, वैभव शिंदे, मनोहर वुंâभार, सूरज सपकाळ, नंदकिशोर सांगुर्डे, होनाजी धादवड, विकास मरगळे, दत्ता चव्हाण, स्वप्निल गायकवाड, गणेश बाठे यांनी केली.