पुणे: लष्करभरती पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सुत्रधार आणि त्याच्या साथीदाराला दिल्ली आणि सिकंदराबाद येथुन अटक

पुणे, दि. 18 मे 20211: लष्करातर्फे शिपाई या पदासाठी घेण्यात येणाऱ्या भरती परिक्षेची प्रश्‍नपत्रिका फोडल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली. नुकतेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि त्याच्या साथीदाराला पुणे पोलिसांनी दिल्ली आणि सिकंदराबाद येथुन अटक केली.

लष्करातर्फे पुण्यासहित देशभराती ४० केंद्रात आर्मी शिपाई या पदासाठी भरतीप्रकीया सुरु करण्यात आली होती व त्याची लेखी परिक्षा 18 फेब्रुवारी रोजी होणार होती. मात्र या परिक्षेच्या प्रश्‍नपत्रिका फोडून काहीजण ती प्रश्‍नपत्रिका व्हॉटसअप वरुन वेगवेगळया खाजगी सैनिक भरती प्रशिक्षण केंद्रप्रमुखांना भरघोस रकमेला विकणार असल्याची गोपनीय माहिती, लष्कराच्या पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स लायझन युनिटला मिळाली होती.

याबाबत मिलिटरी इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांना माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपयुक्त यांना याविषयी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार कारवाई करत, पुणे पोलिसांनी वानवडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन किशोर गिरी,(रा.माळेगाव ता.बारामती जि. पुणे), माधव गित्ते,(रा.सॅपर्स विहार कॉलनी, विश्रांतवाडी, पुणे), गोपाळ कोळी,(रा.बीईजी सेंटर,दिघी, पुणे) आणि उदय औटी,(रा.बीईजी सेंटर खडकी,पुणे) यांना अटक केले. या आरोपीच्या चौकशीत हस्तगत केलेली प्रश्‍नपत्रिका मूळ प्रश्‍नपत्रिकेशी जुळत असल्याचे भारतीय सेनेच्या संबधित अधिका-यांनी प्रमाणित केल्यानंतर पुर्ण भारतातील सैन्य भरती पेपर रद्द करण्यात आला होता.

हा पेपर कुठुन व कसा प्राप्त झाला याचा तपास केला असता, तामिळनाडु येथील लष्करी अधिकारी थिरु मुरगन याच्या मोबाईल व्हॉटसअपवरुन हा पेपर आला आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. पुढील चौकशीत दिल्ली येथील अधिकारी वसंत किलारी याच्याकडुन हा पेपर आला असल्याचे निष्पन्न झाल्याने. त्यास अटक करण्यात आले. या गुन्ह्याच्या पुढील तपासात सिकंदराबाद येथील ओ.ओ.सी.सेंटर येथील भरती प्रक्रीया प्रमुख अधिकारी भगतप्रितसिंग बेदी यांने पेपर लिक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पुणे पोलिसानी सिकंदराबाद येथे जाऊन योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन बेदी यास अटक केली तर दुसरा सहकारी नारनेपाटी विरप्रसाद याला नवी दिल्ली येथुन त्याच्या राहत्या घरातुन ताब्यात घेऊन पुणे पोलिसांनी अटक केली. आतापर्यंत या गुन्हयांत ९ आरोपीतांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्‍त डॉ.रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्‍त,(गुन्हे) श्रीनिवास घाडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त-२, गुन्हे शाखा लक्ष्मण बोराटे, खंडणी विरोधी पथकाचे व.पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संदीप बुवा, शिरीष भालेराव, सहायक फौजदार पांडुरंग वांजळे, यशवंत
ओंबासे, पोलिस हवालदार अतुल साठे, प्रवीण रजपूत, मधुकर तुपसौंदर, फुलपगारे, हेमा ढेंबे पोलिस नाईक नितीन कांबळे, गजानन सोनवलकर, अश्विनी केकाण, राजेंद्र लांडगे, पोलिस शिपाई प्रफुल्ल चव्हाण, नितीन रावळ, विवेक जाधव, अमर पवार, पिराजी बेले यांनी केली आहे.