October 26, 2025

व्यंगचित्रकाराच्या कलेला दाद दिली पाहिजे – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

पुणे, २८/०१/२०२५: महाराष्ट्राला हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आर.के लक्ष्मण यांच्यासारख्या व्यंगचित्रकारांची परंपरा आहे. व्यंगचित्र हे लाखो लोकांच्या भावना व्यक्त करत असतात. ‘बाळकडू-वस्त्रहरण’प्रदर्शनाच्या माध्यामतून समाजातील नेमक्या घटना, राजकारणी लोकांच्या बेगडी वागण्यावर प्रहार करण्यात आला आहे. व्यंगचित्र ही एक कला आहे, त्यामुळे याकडे कोणत्या व्यक्तीविषयी प्रेम किंवा द्वेश म्हणून न पाहता व्यंगचित्र म्हणून पाहिले पाहिजे. व्यंगचित्रकाराच्या केलेला दाद दिली पाहिजे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त बालगंधर्व कलादालन येथे आयोजित ‘बाळकडू-वस्त्रहरण’ या राजकीय व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते झाले. उपनेत्या सुषमा अंधारे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, व्यंगचित्रकार अमित पापळ यावेळी उपस्थित होते. कलादालनाच्या प्रवेशद्वारावर संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीची पाटी लावण्यात आली होती व या पाटीला दोरखंड लावण्यात आला होता. दानवे यांच्या हस्ते हा दोरखंड ओढून प्रतिकात्मक फाशी देण्यात आली.

अंबादास दानवे म्हणाले, या प्रदर्शनाचे नाव वस्त्रहरण आहे आणि आपल्याला मच्छिंद्र कांबळी यांचे वस्त्रहरण नाटक चांगल्या पद्धतीने माहिती आहे. या वस्त्रहरण प्रदर्शनाच्या माध्यमातून एकएक व्यक्ती काय आहे. त्याची कृती काय आहे आणि तो प्रत्यक्ष काय आहे हे मांडण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यापासून ते पुणे शहराच्या पोलिस आयुक्तांपर्यंत सगळ्यांची सत्य परिस्थिती या वस्त्रहरण व्यंगचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवून दिली आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती तसेच राज्यात ठीक ठिकाणी सुरू असणाऱ्या आंदोलनाविषयी या प्रदर्शनामध्ये विविध व्यंगचित्रे पाहायला मिळतात. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात एसटीची दरवाढ तसेच सध्याच्या परळीतल्या राजकीय परिस्थितीबाबत त्यांनी मत व्यक्त करत सत्ताधारी पक्ष त्यांच्या पाठीमागे असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

शब्दांच्या शिवायही व्यंगचित्रे बोलत असतात, व्यंगचित्र हे गुदगुल्या करत असतात. कधी ते रेशम चिमटेही काढत असतात. अजिबात कुठेही कटुता न येता समोरच्याला आरसा दाखवण्याचे कामही व्यंगचित्रे करत असतात. कलादालनामध्ये एक दालन हे बीड आणि परळी मध्ये सध्या जे काही घटना सुरू आहे त्यावर आहे. मी परळीची असल्यामुळे मला त्याबद्दल वाईट वाटले. खरंतर परळीचे हे सध्याचे चित्र मान्य करावंच लागेल. कोणताही कलाकार जर आपल्याला आरसा दाखवत असेल तर ते अत्यंत सहिष्णू भावाने आणि सामंजस्याने तो मान्य केला पाहिजे अशा भावना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केल्या.

आयोजक अनंत घरत म्हणाले की, बाळकडू व्यंगचित्र प्रदर्शन म्हणजे या महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाला गलीच्छ राजकारण्यांविषयी आलेला राग असून त्यांच्या व्यक्त झालेल्या भावना आहेत. बाळकडू हि शिवसेनाप्रमुखांची देण आहे.या प्रदर्शांनामध्ये तब्बल १७५ हून अधिक व्यंगचित्र या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९व्या जयंतीनिमित्त व्यंगचित्रकार अमित पापळ यांच्या ‘बाळकडू : वस्त्रहरण’ या राजकीय व्यंगचित्रांचे प्रदर्शन हे बालगंधर्व कलादालन येथे आज आणि उद्या (२९,३० जानेवारी) रोजी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत प्रदर्शन खुले असणार आहे.