पुणे नदी सुधार प्रकल्पाचा परिणाम, नदी पात्रातील रस्ते होणार बंद

पुणे, ०३/०२/२०२२: पुणे महापालिकेकडून मुठा नदीच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प हाती घेताना नदीच्या दोन्ही बाजूने पर्यावरणपूरक कामे केली जाणार आहेत. मात्र, त्याचा फटका कोथरूड, सिंहगड रस्ता, वारजे या भागातील नागरिकांना बसणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत टिळक पूल ते म्हात्रे पूल दरम्यान असणारा नदी काठचा रस्ता कायमस्वरूपी काढून टाकून तेथे सुशोभीकरण केले जाणार असल्याचे महापालिकेच्या सादरीकरणातून स्पष्ट झाले. दरम्यान, हे रस्ते बंद झाले तरी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
पुणे महापालिकेतर्फे पावणे पाच हजार कोटी रुपये खर्च करून मुळा मुठा नदीचा काठ सुशोभित केला जाणार आहे. या प्रकल्पाचे आज महापालिकेतर्फे सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पाचे ११ टप्पे असून, सध्या संगमवाडी ते बंडगार्डन (खर्च ३५१ कोटी), बंडगार्डन ते मुंढवा (खर्च ६०० कोटी) या दोन ठिकाणी काम सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

याठिकाणी प्रामुख्याने काम सुरू झाल्यानंतर नदीच्या दोन्ही बाजूने पर्यावरण पूरक किनारे विकसित करणे, सायकल मार्ग, बाग याचा समावेश आहे. तसेच नागरिकांना बोटिंगची व्यवस्था केली जाईल. विकास आराखड्यात नदीच्या बाजूने दर्शविलेला दीड किलोमीटरचा रस्ताही विकसित केला जाणार आहे.दाट लोकवस्तीचा आणि नदीचे पात्र लहान असलेल्या संगमवाडी ते राजाराम पुलापर्यंत नदीचे किनाराही विकसित केला जाणार आहे. त्याकडे पुणेकरांचे विशेष लक्ष आहे.
मुठा नदीचे पात्र लहान असल्याने ते मोठे केले जाणार आहे. त्यामध्ये निळी पूररेषा काही प्रमाणात बदलणार आहे. बाबा भिडे पूल हा लहान असल्याने तो पाडला जाणार आहे. तर टिळक पुलापासून ते म्हात्रेपूला दरम्यान रस्ता नदीचे पात्र मोठे करणे, सुशोभीकरण करणे यासाठी या भागात सध्या असलेला रस्ता बंद केला जाणार आहे. ही वाहतूक इतर मार्गांनी वळवली जाईल. तसेच नवे रस्ते तयार केले जातील, असा खुलासा प्रशासनाने केला आहे. मात्र, हे नवे पर्यायी मार्ग कसे तयार होतील हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. तसेच नदीपात्रातील रस्ते कायम ठेऊन नदीचे सुशोभीकरणा करणे अशक्य असल्याचे महापालिकेच्या सल्लागारांनी सांगितले.

नदीपात्रातील रस्ते बंद असल्याने कोथरूड, कर्वेनगर, वारजे, शिवणे, सिंहगड रस्ता, नऱ्हे, धायरी, खडकवासला यासह इतर भागात जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. नदीपात्रातील रस्ते बंद झाल्यास सिंहगड रस्ता किंवा कर्वे रस्ता हेच दोन प्रमुख पर्यायी मार्ग असणार आहे.या रस्त्यांचे सध्याची रुंदी व रुंदीकरणातील अडथळ्यांचा विचार करता ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

‘‘नदी सुधार प्रकल्पासाठी नदीपात्रातील रस्ते बंद करावे लागतील. पण यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या भागातील नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी पर्यायी रस्ते महापालिका विकसित करणार आहे. सध्या संगमवाडी ते मुंढवा या दरम्यान केले जाणार आहे. पेठांना लागून असलेल्या मुठा नदीच्या पात्राचे काम करताना पर्यायी मार्गांचेही काम केले जाईल. नदी सुधार प्रकल्प करताना केवळ नदीचे काठच सुशोभित केले जाणार नाहीत. तर नदीचे पाणी स्वच्छ करण्यासाठी जायका प्रकल्पाचे काम सोबतच सुरू केले जाईल.’’ – विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका