एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18 वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अजमीर शेख, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद 

पुणे, 13 मे 2022: डेक्कन जिमखाना व महाटेनिस यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात नवी मुंबईच्या अजमीर शेख याने, तर मुलींच्या गटात पुण्याच्या रुमा गायकैवारी यांनी विजेतेपद संपादन केले. तर, दुहेरीत मुलांच्या गटात जय दिक्षित व निशित रहाणे यांनी तर, मुलींच्या गटात एन हर्षिनी व प्रेशा शंथामूर्ती यांनी विजेतेपद पटकावले.

 

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या अव्वल मानांकित रुमा गायकैवारी हिने तिसऱ्या मानांकित कर्नाटकाच्या श्रीनिधी बालाजीचा 6-2, 6-1 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. रुमा हि ओपन स्कुलमध्ये दहावी इयत्तेत शिकत असून फर्ग्युसन कॉलेज येथे प्रशिक्षक नंदन बाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

 

मुलांच्या गटात अंतिम लढतीत तिसऱ्या मानांकित नवी मुंबईच्या अजमीर शेख याने पुण्याच्या निशित रहाणेचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 7-5 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. अजमीर हा सेंट विलफ्रेड शाळेत बारावी इयत्तेत शिकत असून एनएमएसए(एएसए)अकादमीत प्रशिक्षक शेखर टोम्पे, अल्पेश गायकवाड, अरुण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे हे वर्षांतील दुसरे विजेतेपद असून याआधी त्याने नाशिक येथे झालेल्या एमएसएलटीए राज्य 17 वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.

 

दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात जय दिक्षित व निशित रहाणे यांनी अजमीर शेख व साहिल तांबट यांचा 6-4, 6-0 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. मुलींच्या गटात एन हर्षिनी व प्रेशा शंथामूर्ती या दुसऱ्या मानांकित रुमा गायकैवारी व राधिका महाजन या अव्वल मानांकित जोडीचा 6-2, 7-5 असा पराभव करून विजेतेपद पटकवले. स्पर्धेतील एकेरीतील विजेत्यांना करंडक. प्रशस्तिपत्रक व 50 एआयटीए गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डेक्कन जिमखानाचे मदन गोखले, एआयटीए सुपरवायझर लीना नागेशकर आणि स्पर्धा संचालक प्रसनजीत पॉल यांच्या हस्ते करण्यात आले.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(अंतिम फेरी): मुले: अजमीर शेख(महा)[3]वि.वि.निशित रहाणे(महा)7-6(4), 7-5;

मुली: रुमा गायकैवारी[1](महा)वि.वि.श्रीनिधी बालाजी(कर्नाटक)[3] 6-2, 6-1;

दुहेरी: मुले: अंतिम फेरी: जय दिक्षित/निशित रहाणे वि.वि.अजमीर शेख/साहिल तांबट[1] 6-4, 6-0;

मुली: एन हर्षिनी/प्रेशा शंथामूर्ती[2]वि.वि.रुमा गायकैवारी/राधिका महाजन[1]6-2, 7-5.