सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बजाज फायनान्स’ला 86000 रूपायांचा दंड

पुणे, 19 एप्रिल 2021: महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे वाकडेवाडी येथील बजाज फायनान्स लिमिटेड कंपनीवर करोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. याअंतर्गत कंपनीला 86000/- रुपये दंड करण्यात आला आहे.

करोना संसर्गाला अटकाव घालण्याच्या उद्देशाने शहरात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. या अंतर्गत खाजगी कार्यालयांना कमीत कमी कर्मचारी संख्येत काम करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच कार्यालयात सुरक्षित अंतर राखणे बंधनकारक आहे. बजाज फायनान्स कंपनी येथे महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.19) केलेल्या पाहणीत ८६ कर्मचारी काम करत असल्याचे तसेच सुरक्षित अंतर पाळले जात नसल्याचे आढळले. त्यानुसार कंपनीकडून 86000/- रुपये दंड वसुल करण्यात आला. तसेच यानंतर नियम न पाळल्यास कंपनी सील केले जाईल अशी ताकीद देण्यात आली आहे.

घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय येथील वरिष्ठ आरोग्य निरिक्षक सुनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरिक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी ,किरण मांडेकर ,शिवाजी गायकवाड ,तुषार राऊत सह्याक ,आनंद शेंडगे ,राजेश अडागळे, प्रमोद अडागळे यांनी ही कारवाई केली. महापालिकाने आखुन दिलेल्या नियमानुसार आस्थापना चालू ठेवाव्यायात अन्यथा कोविड प्रतिंबधासाठी कठोर कारवाई
करण्यात येईल, असा इशारा कुलकर्णी यांनी दिला.