अंगावर थुंकल्यामुळे बियर बार कामगाराने केला महिलेचा खून, धनकवडीत महिलेच्या खुनाची उकल

पुणे, दि. २३/०५/२०२१: अंगावर थुंकल्याचा राग आल्यामुळे बियर बारमध्ये काम करणाऱ्या तरुणाने महिलेचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आरोपीला अटक करून धनकवडीतील खुनाची उकल केली आहे. अविनाश विष्णू साळवे (वय २७ ,रा. चैतन्य बियरबार, पाटील नगर, धनकवडी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कल्पना घोष (वय ३२, रा. धनकवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

कल्पना घोष मूळची पश्चिम बंगालची होती. ती धनकवडीतील एका सदनिकेत एकटी राहत होती. शनिवारी सकाळी ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर रहिवाशांनी सहकारनगर पोलिसांना माहिती दिली होती. धनकवडीत महिलेचा खून ल खुनामागचे कारण अद्यााप समजू शकले नव्हते. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चैतन्य बियर बारमध्ये काम करणाऱ्या अविनाश साळवे याला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने कल्पना दारू घेण्यासाठी आल्यानंतर वारंवार शिवीगाळ करीत होती. दोन दिवसांपूर्वी कल्पना बियर बारमध्ये दारु घेण्यासाठी आली असता, तिने अविनाश याला शिवीगाळ केली. त्यानंतर कल्पना अविनाशच्या अंगावर थुंकली होती. त्याचा राग सहन न झाल्यामुळे अविनाश याने कल्पनाचा खून केल्याची कबुली दिली. अशी माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी दिली.