पुणे, २८/०६/२०२१: “जीवनात आपण कितीही यशाच्या शिखरावर पोहोचलो तरी माता, मातृभाषा आणि मातृभूमीला विसरता कामा नये. आपल्या जीवनाचे मूळ माता असून, तिच्याकडून मिळालेले संस्कार आणि जीवनामुल्ये आपल्याला घडवत असतात. मातृशक्तीचा सन्मान नेहमी सन्मान करा,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. स्त्रीशक्ती अद्भुत असून, मातृत्व म्हणजे केवळ आई होऊन बाळाला जन्म देणे नाही, तर सहनशीलता, प्रेम व कारुण्यभाव असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणेतर्फे ‘सुर्यदत्ता स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार-२०२१’ वितरण सोहळ्यात राज्यपाल कोश्यारी बोलत होते. मुंबई येथील राजभवनात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यावेळी सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्रा. अक्षीत कुशल, अधिष्ठाता प्रा. नूतन जाधव, प्रा. मिलिना राजे, प्रा. रोहित संचेती आदी उपस्थित होते.
भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल अभिनेत्री निशिगंधा वाड, विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला, विशेष मुलांसाठीच्या कार्याबद्दल सिस्टर लुसी कुरियन, शिक्षण व महिला सक्षमीकरण क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. स्वाती लोढा, आरती देव, साहित्यातील कार्याबद्दल ललिता जोगड, सायबर सुरक्षा जागृतीबद्दल ऍड. वैशाली भागवत, क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल कविता राऊत-तुंगार, सामाजिक कार्याबद्दल तृषाली जाधव, कलासंगीत क्षेत्रातील कार्याबद्दल पलक मुच्छाल यांना ‘सुर्यदत्ता स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. ललिता जोगड यांनी डॉ. संजय चोरडिया यांच्यावर केलेल्या १३५० ओळींच्या कवितेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “माणूस कितीही यशस्वी व संपन्न झाला तरीही सुख-दुःखप्रसंगी त्याला प्रथम आईचीच आठवण येते. तिच्या शिकवणीतून आपण घडत असतो. आपण ज्या क्षेत्रात कार्य करतोय, ते सर्वश्रेष्ठ झाले पाहिजे, यावर भर द्यावा. विश्वात बंधुभाव रुजवण्यासाठी, तसेच सर्वसमावेशक विकासासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांना दरवर्षी सुर्यदत्ता स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा राज्यपालांच्या हस्ते स्रीशक्तीला गौरवताना आनंद होतो आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्यांचा सन्मान करून पुढील कार्यासाठी त्यांना प्रेरित करणे आपले कर्तव्य आहे.”
निशिगंधा वाड, विशाखा सुभेदार, डॉ. वैशाली भागवत, पलक मुच्छाल, उर्वशी रौतेला यांनीही मनोगत व्यक्त केले. सिमरन आहुजा यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
More Stories
जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर यांना राष्ट्रीय पुरस्कार
पुण्यात पोलीस ठाण्यातच महिलेने प्यायले फिनाईल, आयुक्तालयानंतर कोंढव्यात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे: शहरात वेगवेगळ्या अपघातात तीन ठार, सहकारनगर,वाघोलीत अपघात