September 11, 2025

भिडे पूल २० ऑगस्टपूर्वी वाहतुकीसाठी खुला; गणेशोत्सवात मेट्रो सेवा मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरू ठेवणार – आयुक्त नवल किशोर राम

पुणे, २१ जुलै २०२५ – नारायण पेठ आणि मेट्रो स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या कामामुळे मागील तीन महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला बाबा भिडे पूल येत्या २० ऑगस्टपर्यंत खुला केला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूककोंडी टाळण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार आहे. तसेच गणेशोत्सव काळात मेट्रो सेवा मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत महामेट्रोला सूचना केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे महापालिकेत गणेशोत्सवाच्या तयारीसाठी आज आयोजित बैठकीत आयुक्त बोलत होते. या वेळी गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलिस आणि विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुल बंद असल्याने नागरिकांचा त्रास
महामेट्रोने खंडुजीबाबा चौक ते पुणे महापालिका मार्गावर मेट्रो मार्ग उभारताना मुठा नदी ओलांडून मार्ग नेला आहे. त्यामुळे नारायण पेठ, शनिवार पेठ या भागांना मेट्रोशी जोडण्यासाठी वर्तक उद्यान आणि भिडे पूल येथे पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे भिडे पूल मे महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद आहे. परिणामी वाहनचालकांना मोठा वळसा घालावा लागत असून, पादचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गणेशोत्सवात लाखो नागरिक कोथरूड, नगर रस्ता, पिंपरी-चिंचवडसारख्या उपनगरांतून पेठांमधील गणपती मंडळांना दर्शनासाठी येतात. यावेळी भिडे पूल बंद असल्यास वाहतूककोंडी व गर्दीची समस्या गंभीर होण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रशासनाने पुलाचे काम २० ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

मेट्रो सेवा वाढवणार
या बैठकीत आयुक्त राम यांनी सांगितले की, “पेठांमधील मेट्रो मार्ग आता सुरू झाला असून, कसबा पेठ, मंडई स्टेशनमार्गे नागरिक थेट गणेशोत्सव बघण्यासाठी पोहोचू शकतात. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गणपती दर्शन घेणाऱ्यांसाठी मेट्रो सेवा मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची सूचना महामेट्रोला दिली जाईल.”

ही उपाययोजना राबविल्यास वाहनांच्या संख्येत घट होऊन वाहतुकीवरील ताण कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले. गणेशोत्सव काळात नागरिकांना सुविधा देण्यासाठी पुणे महापालिका आणि पोलिस प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास या बैठकीतून देण्यात आला.