पुणे ता. ११/११/२०२४: भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा स्वरूपाच्या घोषणा देऊन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते समाजातील दुही अधिक तीव्र कशी होईल असा प्रयत्न आपल्या भाषणातून करत आहेत. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते सुनील माने यांनी व्यक्त केले.
सुनील माने म्हणाले, राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रत्येकजण आपापल्या पक्षाचा प्रचार करून आपापल्या पक्षाची भूमिका घेऊन जनतेसमोर जात आहे. मात्र हे करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर लोक ही निवडणूक जातीय आणि धार्मिक मुद्द्यांवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र संत आणि समाज सुधारकांची भूमी असलेल्या या महाराष्ट्रातील जनता खूप सुजाण आहे. संत समाज सुधारकांचे अतिशय खूप चांगल्या पद्धतीची मशागत या महाराष्ट्राच्या भूमीने अनुभवली आहे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या प्रचाराला महाराष्ट्रातील जनता कधी थारा देत नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. तुम्हाला जिवंत राहायचे असेल तर तुम्ही विभाजित राहू नका, जाती जातीत विभागला गेलेला हिंदू एक आहे अशा स्वरूपाच्या घोषणा भाजप नेत्यांकडून आता नव्याने दिल्या जात आहेत. या माध्यमातून लोकांचे खऱ्या प्रश्नांवरून लक्ष भरकटवण्याचे प्रयत्न भाजप करत आहे. पण भाजप एक महत्वाची गोष्ट विसरत आहे. देशात हिंदू समाजाच्या ६ हजारांच्या आसपास असणाऱ्या जाती आणि पंथ निर्माण झालेत, त्याची जबाबदारी मुळात भाजपाला चालवणाऱ्या समाजाची आहे. त्यामुळे या जाती, त्यातले पंथ एकमेकांच्या विरोधात उभा राहणार नाहीत याची जबाबदारी भाजप म्हणून आणि त्यांना दिशा देणाऱ्या लोकांनी घेतली पाहिजे. त्यांनी समाज कसा एकोप्याने राहील आणि विकास कसा साधला जाईल अशी भूमिका घेतली पाहिजे. मात्र याउलट ते वेगवेगळ्या जाती, धर्मांमध्ये, भांडण लावून विधानसभा निवडणुकीत आपली पोळी भाजून घेण्याची भूमिका घेत आहेत. पुन्हा सरकार बनवण्यासाठी हे सगळे नॅरेटिव्ह तयार करून फेक पद्धतीने भाजप वापरत आहे.
ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आता नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस प्रचार करत आहेत ती एक गंभीर बाब आहे. अशा पद्धतीच्या भूमिकेने महाराष्ट्राच्या सुजाण नागरिकांच्या समाज जीवनात विष कालवले जाऊ शकते. महाराष्ट्राच्या समाज जीवनासाठी त्या गंभीर बाबींना आपण धुडकावून लावले पाहिजे. धर्माधर्मात तेढ तयार होऊन महाराष्ट्राचं लोकजीवन अशांत व्हावं हा भाजप आणि मित्रपक्षांचा विचार अशा प्रकारचा प्रचार करण्यापाठीमागे आहे. मात्र कोणत्याही कारणाने महराष्ट्राची शांतता बिघडणार नाही हा आमचा विश्वास आहे. महाराष्ट्रातील जनता अशा प्रकारचा विखारी प्रचार करणाऱ्या भाजपाला राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी चोख उत्तर देईल आणि महाविकास आघाडीला निवडून देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर