December 21, 2025

निवडणुकीआधी भाजपचा मेगा स्ट्राईक! पुणे–पिंपरीत २२ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; राष्ट्रवादी–उबाठा–काँग्रेसला मोठा धक्का

पुणे, २० डिसेंबर २०२५: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप घडवत थेट विरोधकांच्या गडांना सुरुंग लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमधील २२ माजी नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने अनेक प्रभागांतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.

या प्रवेशामुळे पुण्यात पाच तर पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल १७ माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले असून, त्यात माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते यांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

महापालिकेची निवडणूक जानेवारीत होणार असून २३ ते ३० डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने थेट ‘विजय फॉर्म्युला’ राबवत ज्या प्रभागांमध्ये स्वबळावर अडचण आहे, तेथे विरोधी पक्षांतील वजनदार नेत्यांना पक्षात सामावून घेतले आहे. आजचा प्रवेश हा पहिला टप्पा असून पुढील चार-पाच दिवसांत आणखी मोठे प्रवेश होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

पुण्यातील गड ढासळले

वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांच्यासह नारायण गलांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खडकवासला मतदारसंघातील वारजे-माळवाडी येथील सचिन दोडके, सायली वांजळे, धनकवडीतील बाळासाहेब धनकवडे, वडगाव बुद्रुकमधील विकास दांगट यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

हडपसर मतदारसंघात काँग्रेसला मोठा हादरा बसला असून वैशाली तुपे, विराज तुपे, पायल तुपे, इंदिरा तुपे, प्रशांत तुपे, खंडू लोंढे, राजेंद्र लोखंडे, बाबा शिवरकर, विद्यानंद बोंद्रे, प्रतिभा चोरगे, शुभांगी होले (शिवरकर) यांच्यासह अनेक पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले. कोथरूडमध्ये माजी नगरसेविका रोहिणी चिमटे यांनीही भाजप प्रवेश केला.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा ‘धमाका’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष केंद्रीत केलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने आज जोरदार राजकीय खेळी केली. लोकसभेतील उबाठा उमेदवार व माजी महापौर संजोग वाघेरे आणि माजी स्थायी समिती अध्यक्षा उषा वाघेरे यांचा भाजप प्रवेश हा उबाठा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, तसेच रवी लांडगे, प्रवीण भालेकर, समीर मासुळकर, जालिंदर शिंदे, प्रसाद शेट्टी, आशा सूर्यवंशी यांच्यासह काँग्रेस व उबाठामधील अनेक माजी नगरसेवक भाजपमध्ये आले आहेत. काही प्रवेशांवर स्थानिक पातळीवर विरोध असतानाही वरिष्ठ पातळीवरील हस्तक्षेपामुळे प्रवेश निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे.

भाजपची रणनीती स्पष्ट

या प्रवेशामुळे अनेक प्रभागांतील सत्तासमीकरणे बदलणार असून विरोधकांची मतपेढी कोलमडण्याची शक्यता आहे. भाजपने निवडणुकीआधीच आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार संग्राम थोपटे, शंकर जगताप, महेश लांडगे, शहराध्यक्ष धीरज घाटे, शस्त्रुघ्न काटे, पुणे महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आदी नेते उपस्थित होते.