पुणे: बोपखेल येथील रखडलेल्या उद्यानाचे काम पुन्हा सुरू होणार

पिंपरी, १९ फेब्रुवारी २०२२: कोरोना काळ आणि महापालिका प्रशासनाने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याने बोपखेल सर्व्हे नंबर 4, 5 मधील रखडलेले उद्यानाचे काम पुन्हा वेगात सुरु झाले आहे. लवकरच त्याचे काम पूर्ण होऊन उद्यान बोपखेलकरांसाठी खुले होईल, अशी माहिती उपमहापौर हिरानानी घुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

 

उपमहापौर हिरानानी घुले म्हणाल्या, दिघी-बोपखेल महापालिकेत समाविष्ट झालेले गाव असून शहराचे शेवटचे टोक आहे. 2017 मध्ये निवडून आल्यापासून प्रभागातील शाळा, महिला प्रसृतीगृह, पाण्याची टाकी, उद्यानांची आरक्षणे ताब्यात घेतली. ती विकसित करण्यावर भर दिला असून ती अंतिम टप्प्यात आहे. बोपखेल सर्व्हे नंबर 4, 5 मधील उद्यानाचे काम सुरु करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्याला यश येऊन 3 कोटी 30 लाख रुपयांचे काम सुरु झाले होते. ते काम डीडी कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला दिले होते.

 

वर्क ऑर्डर देताच 2019 च्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने काम थांबले. आचारसंहिता संपल्यानंतर काम सुरु झाले. उद्यानाचे काम जवळपास 30 ते 40 टक्के झाले होते. एवढ्या वेगात काम सुरु होते. दरम्यान, बोगस एफडीआर प्रकरणी या ठेकेदारावर कारवाई झाली. महापालिका प्रशासनाने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले. कोरोना काळात प्रशासनाने कामे थांबविली होती. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याने आणि कोरोनामुळे पुन्हा उद्यानाचे काम रखडले. यामध्ये मोठा कालावधी गेला.

 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर उद्यानाच्या कामासाठी पुन्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु केला. त्यानंतर प्रशासनाने उद्यानाच्या उर्वरित कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविली. 1 कोटी 94 लाखांची निविदा प्रसिद्ध करुन सर्वात कमी दर आलेल्या ठेकेदाराला स्थायी समितीच्या मान्यतेने काम दिले. त्याला वर्क ऑर्डरही दिली असून आता काम सुरु आहे. वेगात काम केले जात आहे. लवकरच उद्यानाचे काम पूर्ण होईल आणि उद्यान बोपखेलमधील नागरिकांना वापरण्यास खुले होईल असा विश्वास उपमहापौर हिरानानी घुले यांनी व्यक्त केला.