बोनेटवर बसून शुटिंग आले अंगलट, लग्नादिवशीच गुन्हा दाखल, कोरोना नियमाचे उल्लंघन भोवले

पुणे, १३/०७/२०२१:- कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत थेट मोटारीच्या बोनटवर बसून पुण्यातील दिवे घाटात व्हिडिओ चित्रीकरण करणे एका वाग्दत्त वधूला अंगलट आले आहे. धोकादायकपणे प्रवास करणे, मास्क न परिधान करणे, कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या नवरीविरूद्ध तिच्या लग्नादिवशीच लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय चालक, व्हिडिओग्राफरसह तिघेजण गोत्यात आले आहेत.

लॉकडाऊनमुळे अनेक जोडप्यांनी लग्नासाठी विविध पर्यायांचा अवलंब करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. मात्र, भोसरीतील एका नववधूने थेट जीपच्या बोनेटवर बसून दिवे घाटात व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यावेळी तिच्यासोबत कुटूंबिय आणि चालकासह व्हिडिओग्राफरही होता. नियमावलीचे उल्लंघन करीत मोटारीच्या बोनटवर बसलेल्या वाग्दत्त वधूचा व्हिडिओ हायरल झाला होता. सासवडजवळील मंगल कार्यालयात संबंधित मुलीचा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, अतिउत्साहात नियम पायदळी तुडवत तिच्यासह कुटुंबीयांनी दिवे घाटातून जीवघेणा प्रवास केला. विनामास्क असलेल्या नवरीने बोनेटवर बसून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घातला. तिच्या कुटुंबीयांनी देखील याबाबत कोणतीही खबरदारी न घेता निष्काळजीपणा बाळगला होता. त्यामुळे याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी लग्नादिवशीच मुलीसह इतरांविरूद्ध गुन्हा दाखल केला.