September 12, 2025

बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे, १२ मे २०२५: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे बनवून पोलिसांची दिशाभूल केल्या प्रकरणी पुण्यातील समर्थ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंतनु कुकडे गुन्हा प्रकरणात आरोपी शंतनु कुकडेसोबत झालेल्या आर्थिक प्रकरणात पोलिसांची दिशाभूल केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल्ल म्हणाले की, “पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशन येथे आधीपासून एका गुन्ह्याचा तपास सुरू होता. शंतनु कुकडे नावाचा मुख्य आरोपीचा तपास करताना कुकडे हा रेड हाऊस नावाची संस्था चालवत होता व या संस्थेच्या आणि कपकडे याच्या खात्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे समजले. याचा तपास पोलिसांकडून सुरू असताना यात बनावट कागदपत्रे झाल्याचे समोर आले. हा व्यवहार रौनक जैन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यात झाल्याचे स्पष्ट झाले. या व्यवहारांचा संबंध शंतनू कोकडेच्या संस्थेशी असल्याचे समजताच याप्रकरणी दीपक मानकर यांच्यासह तीन जणांवर समर्थ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष असलेल्या शंतनू कुकडेला काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले. तसेच शंतनू कुकडे आणि दिपक मानकर यांच्यात एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी याबाबत दिपक मानकर यांची चौकशी केली असता त्यांनी काही कागदपत्रे पोलीसांसमोर सादर केली होती. परंतू मानकर यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पोलिसांनी सत्यता तपासली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे मानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.