कुलकर्णी, कानडे, व्हिएगस, भोई, मेश्रामकर यांना चंदू बोर्डे फाऊंडेशन पुरस्कार

पुणे, २१ नोव्हेंबर २०२२ ः भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी ला कर्णधार आणि बीसीसीआयच्या सदस्या शुभांगी कुलकर्णी, चित्रपट निर्मात्या क्रांती कानडे, प्रख्यात वैद्यकीय व्यवसायिक डॉ. अर्जुन व्हिएगस, सामाजिक कार्यकर्ते  डॉ मिलिंद भोई , श्रवणदोषांसाठी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री अरविंद मेश्रामकर यांच्यासह विविध खेळातील १० युवा खेळाडूंना  चंदू बोर्डे फाऊंडेशनतर्फे  सन्मानित करण्यात आले.

भारतीय क्रिकेटमधील एक आदराचे स्थान असणाऱ्या माजी कसोटीपटू पद्मभूषण चंदू बोर्डे यांच्या परिवाराच्या पुढाकाराने चंदू बोर्डे फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आणि याच फाउंडेशनच्या वतीने पहिल्या  आदर्श पुरस्काराचे आणि खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा खास सोहळा शनिवारी वायएमसीए येथे पार पडला. वीरचक्र पुरस्कार प्राप्त कर्नल लैत राय यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

 
या वेळी बोलताना कर्नल राय म्हणाले की, खिशातल्या पैशासाठी किंवा खिशात पैसे मिळवण्यासाठी धावू नये, तर तुमच्या हृदयातील आशा आणि मनातील स्वप्नांसाठी बोली लावली पाहिजे. आकाशात उडण्यासाठी नुसते पंख असून चालत नाही, तर उडण्याची जिद्द असावी लागते. आपल्या समोर उद्दिष्टे आणि अशी जिद्द असली, तर मोठी भरारी घेता येते. या पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी अशीच कामगिरी केली आहे.

श्री. बोर्डे यांनी कायम पाठिशी राहणाऱ्या समाजाचे आभार मानले.  समाजाने  खूप काही दिले आहे. त्याचे उतराई होण्यासाठी माझ्या बोर्डे कुटुंबियाने हा प्रयत्न केला आहे. ज्यांनी कारकिर्द घडविण्यासाठी सर्वस्व वाहिले असे खेळाडू आणि समाजासाठी सर्व काही दिले आहे अशा व्यक्तींचा सन्मान करणे हे आम्ही आमचे भाग्य मानतो, असे बोर्डे म्हणाले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोर्डे यांनी क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या यशाचा आवर्जुन उल्लेख केला. खेळासह अन्य क्षेत्रातही महिला देशाचा गौरव उंचावत आहेत हे पाहून  महिला कर्तुत्वाचा आम्हाला अभिमान वाटतो, असे बोर्डे म्हणाले.

आमच्या निवड समितीने निवड केलेल्या युवा खेळाडूंमध्ये क्रिकेटसह अन्य खेळातील खेळाडूंचाही समावेश आहे. खेळाडूंच्या कामगिरीने देशाचा गौरव उंचावतो. अशा खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्यासाठी हा सगळा पुरस्कार प्रपंच मांडल्याचेही बोर्डे यांनी सांगितले.


चंदू बोर्डे आणि कर्नल ललित राय यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी विजया बोर्डे, अविनाश बनसोडे, डॉ महेंद्र चित्रे, सुरेंद्र मोहिते, प्रविण मेकॅनजी, अर्जुनवीर काका पवार, माजी रणजी कर्णधार मिलिंद गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते, वेटलिफ्टिंग मार्गदर्शक शरद काळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशांत वाघमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर, 
प्रतिष्ठानचे विश्वस्त उदय बोर्डे यांनी प्रास्ताविकात फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली, तर मोना भिडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. पुरस्कार सोहळ्यात आदर्श पुरस्कारामध्ये रोख २५,००० रुपये, शाल, स्मृतीचिन्ह असे स्वरुप होते.  काही नवोदित युवा खेळाडूंना रोख १० हजार रुपयाची शिष्यवृत्ती देण्यात आली.

पुरस्कार विजेते – क्रिकेट, मृण्मयी साळगावकर- रोइंग, प्रथमेश सोनार- जलतरण, पृथा वर्टीकर- टेबल टेनिस. कुशी मुल्ला – क्रिकेट, नताशा डुमणे – तिरंदाजी, सिद्रा अन्वर शेख – बॉक्सिंग, सिद्धांत बिंडे – वेटलिफ्टिंग, ज्योतिबा अटकले – कुस्ती, अभिजीत सर्जेराव खोपडे – तायक्वांदो, क्रिकेट – 
अथर्व वणवे