October 5, 2024

छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्यांमधून अनेक असामान्य व्यक्ती घडविल्या: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांचे प्रतिपादन

पुणे, दि. १ ऑक्टोबर, २०२४ : ज्या काळी संपूर्ण देशभरात मुघलांची सत्ता, आदिलशाही, निजामशाही यांनी तांडव माजवला होता. सगळी प्रजा आणि देश अत्यंत वाईट स्थितीमध्ये होता. ज्यांच्यावर जबाबदारी होती, ज्यांनी संघर्ष करणे अपेक्षित होते त्या सर्वांनी जबाबदारी टाळत हार पत्कारली होती अशा परिस्थितीत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य व्यक्तींमधून अनेक असामान्य व्यक्ती घडविल्या. छत्रपती शिवाजी महाराज हे एक अद्वितीय महापुरुष होते त्यांनी आपल्या जीवनचरित्राने पुढील कित्येक पिढ्यांना प्रेरणा दिली, असे गौरवोद्गार मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांनी काढले.

डॉ यादव यांनी आज पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने न-हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’ला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, डॉ विनय सहस्त्रबुद्धे, अमृत पुरंदरे, विनीत कुबेर, मध्यप्रदेश सरकारचे पूर्व मंत्री ओमप्रकाश सकलेचा, आमदार भीमराव तापकीर, यांसोबतच मनोज पोचट, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आदी यावेळी उपस्थित होते. डॉ यादव यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत वंदन केले. शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ, शिवप्रतिमा देत प्रतिष्ठानच्या वतीने डॉ यादव यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ यादव म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनंतर शिंदे, होळकर, पवार या घराण्यांनी त्यांचा विचार पुढील पिढ्यांमध्ये रुजवला. अहिल्यादेवी होळकर यांनीही ही परंपरा पुढे चालू ठेवली. मी माळवा- उज्जैन या प्रांतामधून येतो, महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन अहिल्यादेवी होळकर यांनी धर्मरक्षण, मंदिर उभारणी आणि महत्त्वाच्या मंदिरांचा केलेला जीर्णोद्धार यांचे जे काम केले यामागे मूळ विचार हा छत्रपती शिवाजी महाराजांचाच होता. याच मंदिरांमध्ये आज आम्ही पूजा करतो ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.”

आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील याच उदात्त भावनेने काम करीत आहेत आणि म्हणूनच जेव्हा नौसेनेचा नवा ध्वज करण्याची संकल्पना पुढे आली तेव्हा महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेण्याचा विचार केला गेला, असे डॉ यादव यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांमुळे आज स्वराष्ट्र, स्वधर्माचा विचार महाराष्ट्रातून जगभरात पसरत असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसृष्टी पाहताना पद्मविभूषण डॉ बाबासाहेब पुरंदरे शिवसृष्टीच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहे असा भास झाला असेही डॉ यादव म्हणाले.

प्रास्ताविक करताना जगदीश कदम म्हणाले, “शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्यानंतर आता पुढील दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण लवकरच होईल. आजवर या प्रकल्पासाठी १२५ कोटी रुपये खर्च झाले असून संपूर्ण प्रकल्पाचा खर्च हा ४३८ कोटी रुपये इतका आहे.” मध्यप्रदेश सरकारने देखील शिवसृष्टी प्रकल्पाला आर्थिक मदत केल्याची आठवण कदम यांनी सांगितली. पुढील दोन वर्षांत शिवसृष्टीचा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा मानस असल्याचेही कदम यांनी नमूद केले. अनिल पवार यांनी सर्वांचे स्वागत केले.