पुणे शहरातील वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे; शिवसेनेच्या शिंदे गटाकडून निवेदन, पुढील आठवड्यात मुंबईत बैठक बोलावणार

पुणे, ९ ऑक्टोबर २०२२ : शहरातील वाहतूक कोंडी दूर करावी, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शनिवारी देण्यात आले. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले.

मुख्यमंत्री शिंदे हे आळंदीला जाण्यापूर्वी शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. या कोंडीवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यात यावा. तसेच, महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत. पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा अध्यादेश काढण्यात यावा, अशा विविध मागण्या मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करण्यात आल्या.
या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत सविस्तर सकारात्मक चर्चा झाली आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात मुंबई येथे बैठक आयोजित करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे शहराध्यक्ष भानगिरे यांनी सांगितले.