पुणे: लहानग्यांनी लुटला रॅम्बो सर्कसचा आनंद

पुणे, 28/02/2022: विदूषकांच्या गमतीजमती, विविध साहसपूर्ण व चित्तथरारक प्रात्यक्षिके, पाळीव प्राण्यांच्या लक्ष्यवेधी कवायती, मृत्यू गोलातील थरार, मुलामुलींचे कसरतीचे प्रयोग आणि रोमहर्षक नृत्य, सायकलवरच्या-दोरीवरच्या तोल सांभाळत केलेल्या कसरती, रिंगमास्टरच्या तालावर नाचणारे प्राणी पाहून लहानग्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. टाळ्यांचा कडकडाट मुलांनीही सर्कशीतील कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली.

निमित्त होते, वंचित विकास संस्थेतर्फे फुलवा प्रकल्प आणि अभिरुची वर्गातील लहान मुलांसाठी आयोजिलेल्या रॅम्बो सर्कस प्रयोगाचे! सिंहगड रस्त्यावर लागलेल्या सर्कसचा प्रयोग पाहून कोरोनामुळे कोमेजलेल्या या चेहऱ्यावर हास्याचे धुमारे उडाले. साडेतीनशेहून अधिक मुलामुलींनी याचा आनंद घेतला. संस्थेच्या संचालक मीनाताई कुर्लेकर, सुनीताताई जोगळेकर, देवयानी गोंगले, स्नेहल मसालिया यांच्यासह प्रत्येक वर्गाच्या ताई उपस्थित होत्या.

स्नेहल मसालिया म्हणाल्या, “सर्कस बघायला सर्वांना आवडते. पण वस्तीमधील मुलांना या गोष्टी बघायला मिळत नाहीत. त्यामुळे वंचित विकास संस्थेने या मुलांकरिता खास प्रयोगाचे आयोजन केले होते. सर्कसमधील खेळ बघताना लहान मुलांच्या चेहेऱ्यावर हसू आणि आनंद दिसत होता. यावेळी सर्व मुलांना खाऊंचेही वाटप करण्यात आले. येथे असलेल्या प्राण्यांच्या प्रतिकृतीसोबत या मुलांनी खेळण्याचा, छायाचित्रे काढण्याचा आनंद घेतला.”